हिंदुस्थानने वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले अन् राहुल द्रविड यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाची यशस्वी सांगता झाली. द्रविड यांच्या जागी गौतम गंभीर हिंदुस्थानी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनले. नोव्हेंबरपासून त्यांनी ‘टीम इंडिया’च्या प्रशिक्षकपदाचा प्रवास सुरू केला. मात्र, गौतम गंभीर प्रशिक्षक बनल्यापासून ‘सर्वोत्तम हिंदुस्थान’ची अवस्थाही गंभीर बनली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील निर्भेळ यश सोडल्यास ‘टीम इंडिया’च्या यशाचा आलेख घसरला आहे. प्रशिक्षक या नात्याने गौतम गंभीर यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
नेहमीच खडतर समजल्या जाणाऱया हिंदुस्थान दौऱयावर न्यूझीलंडने बंगळुरूमधील पहिल्या कसोटीत बाजी मारत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 36 वर्षांपासूनचा विजयाचा दुष्काळ संपविला. त्यानंतर पुण्यातील दुसरी कसोटी जिंकून मालिकाविजय साजरा करीत न्यूझीलंडने नवा इतिहास रचला. हिंदुस्थानातील त्यांचा हा कसोटी क्रिकेटमधील पहिला मालिकाविजय ठरला. दुसरीकडे कसोटी मालिकेतील या पराभवामुळे ‘टीम इंडिया’चा 12 वर्षे आणि सलग 18 मालिकांत अपराजित राहिलेला मायदेशातील विजयरथ रोखला गेला. त्यामुळे नवे प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कार्यपद्धतीवर देशभरात टीकेची झोड सुरू झाली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रशिक्षकपदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागलेय.
बांगलादेशला हरविले, पण..
श्रीलंका दौऱयातील संमिश्र यशानंतर ‘टीम इंडिया’ला बांगलादेशविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची होती. ‘टीम इंडिया’ने बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आणि 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव झाला आणि न्यूझीलंडला 36 वर्षांनंतर टीम इंडियाविरुद्ध पहिला विजय मिळाला.
अखेर विजयरथ रोखला
न्यूझीलंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका आधीच 2-0 फरकाने खिशात घालून 12 वर्षांपासूनचा घरच्या मैदानावर ‘टीम इंडिया’चा कसोटी मालिकेतील विजयरथ रोखला. गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर हिंदुस्थानने 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली. मग 36 वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात पराभव पत्करला. त्यानंतर 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची नामुष्कीही रोहित शर्माच्या हिंदुस्थानी संघावर ओढवली. आता मुंबईतील तिसऱया कसोटीनंतर हिंदुस्थानी संघाला ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱयावर जायचे आहे. या दौऱयावर ‘टीम इंडिया’ची खरी ‘कसोटी’ असेल.
गंभीरच्या कार्यकाळात दुसरी खराब कामगिरी
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर ‘टीम इंडिया’च्या खराब कामगिरीवर आगामी काही आठवडे नक्कीच विचारमंथन करतील. मात्र, गंभीरच्या प्रशिक्षक कालावधीत ‘टीम इंडिया’ची ही दुसरी खराब कामगिरी आहे. गंभीरने श्रीलंकेविरुद्ध ‘टीम इंडिया’च्या प्रशिक्षकपदाचा श्रीगणेशा केला. ‘टीम इंडिया’च्या टी-20 मालिकेत निर्भेळ यश संपादन करीत गंभीरला विजयाची भेट दिली. मात्र, त्यानंतर लगेच झालेली एकदिवसीय मालिका हिंदुस्थानने 0-2 फरकाने गमावली. तब्बल 27 वर्षांनंतर श्रीलंकेने हिंदुस्थानविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. गंभीरच्या नव्या इनिंगमध्ये ‘टीम इंडिया’चे हे पहिले अपयश होते.