हतबल ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणूनही काम करावे; वांद्रे चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरे यांचा संताप

वांद्रे- गोरखपूर एक्सप्रेस पकडताना वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सुमारे 28 रेल्वे अपघात झाले आहेत. असे असतानाही रेल्वेमंत्री काय करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संतपा व्यक्त केला आहे. या घटनेतून रेल्वेमंत्री हतबल असल्याचे दिसून येत आहे, या रीलमंत्र्यांनी आता कधीतरी रेल्वेमंत्री म्हणून काम करावे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला.

सोशल मिडियावर एक्सवर पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपल्या ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं. सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते. भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, परंतु दर आठवड्याला दर आठवड्याला काही ना काही घटना रेल्वे दुर्घटना आणि अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं, हे लज्जास्पद आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची घटना घडली. यात 9 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची फलाटवार गर्दी झाली होती. याच गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.