दिवाळीच्या काळात एसटीला गर्दी असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडू नये, यासाठी चालक-वाहक ड्यूटीवर आल्यावर मद्यपानाची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात येत आहे. पुणे विभागातील स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारांसह जिल्ह्यातील सर्व आगारांतील चार हजार चालक-वाहकांची अल्कोहोल तपासणी नुकतीच करण्यात आली. पुणे एसटी यामध्ये दोन चालकांनी आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रवासात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाकडून मद्यपान तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिवाय सध्या एसटीला प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बसचालकांची प्रत्येक फेरीपूर्वी अल्कोहोल तपासणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात खासगी ठेकेदारांच्या गाड्या भाडेतत्त्वावर चालविल्या जातात. यात शिवशाही, शिवनेरी बसेसचादेखील समावेश आहे. भाडेतत्त्वावरील गाड्यांना चालक पुरवण्याचे कामही खासगी ठेकेदारच करत असतात. यावर महामंडळाने बसेसवरील सर्व चालकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्यातील दोन्ही आगारांसह जिल्ह्यातील सर्व आगारांतील चार हजार चालक- वाहकांची मद्यपान तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन चालक दोषी आढळले असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
जेवणासाठी थांबल्यावर मद्यप्राशनाची शक्यता
चालक सुरुवातीच्या स्थानकावरून बस घेऊन जाताना मद्यप्राशन करत नाहीत. पण, जेवणासाठी थांबल्यावर किंवा इतर ठिकाणी थांबून मद्यप्राशन करून बस चालविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महत्त्वाच्या स्थानकांवर ब्रेथ अॅनालायझरद्वारे चालक-वाहकांची तपासणी करणे गरजेचे आहे. यासाठी विविध स्थानकांवर मशिन्स दिल्या आहेत. पण, सध्या याचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येते.
एसटी चालक कामावर आल्यावर ब्रेथ अॅनालायझरद्वारे अल्कोहोल तपासणी करून त्याच्याकडे बस दिली जाते. पुणे विभागात मद्यपान तपासणी मोहीम कायम राबविली जाते. यामध्ये दोन चालक दोषी आढळले आहेत. त्यांना कामावरून निलंबित करण्यात आले आहे.