कल्याणमध्ये लाडक्या बहिणींची भाजपवाल्यांकडून लूट; अर्ज भरण्यासाठी 300 रुपये उकळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल

कल्याणमध्ये खुलेआम लाडक्या बहिणींची भाजपवाल्यांकडून लूट सुरू आहे. या योजनेचे पैसे हवे असतील तर आमच्याकडून अर्ज भरून घ्या, असे सांगत प्रत्येक अर्जामागे भाजपचे काही पदाधिकारी व त्यांचे अन्य बगलबच्चे तीनशे रुपये उकळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कल्याण ग्रामीणमधील चेरानगर परिसरात ही लुटालूट करण्यासाठी खास कार्यालयच थाटण्यात आले आहे. दरम्यान या गोरखधंद्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते धीरज तिवारी यांनी आवाज उठवताच भाजप पदाधिकारी राजन पांडे याने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप व मिंधे गटाला मतदारांनी जोरदार दणका दिला. त्यामुळे तंतरलेल्या मिंध्यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून महिना पंधराशे रुपये देण्याचे जाहीर केले. मात्र या योजनेच्या आडून सत्ताधारीच आपले खिसे भरून चेलेचपाटे करत असल्याचे कल्याणमध्ये समोर आले आहे. कल्याण ग्रामीणमधील सागाव-चेरानगर भागात लाडकी बहीण योजनेसाठी काही महिलांचे अर्ज भरणे शिल्लक होते. अशा महिलांना येथील एका कार्यालयात बोलावून त्यांचे अर्ज भरून दिले जात होते. यासाठी प्रत्येक अर्जामागे 300 रुपये उकळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

याबाबत सागाव येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते धीरज तिवारी यांनी चाललेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. त्यावर भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने तिवारी यांच्या पत्नीला फोन करून शिवीगाळ केली. इतकेच नाही तर भाजपचे पदाधिकारी राजन पांडे यानेदेखील हा व्हिडीओ व्हायरल केला तर तुला मारू अशी धमकी दिली.

डोंबिवलीत राहायचे आहे ना?

भाजप पदाधिकाऱ्यांच्या धमक्यांना भीक न घालता धीरज तिवारी यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती भाजपचे कल्याण ग्रामीण उत्तर भारतीय सेलचे वरिष्ठ पदाधिकारी नागेंद्र फौजदार यांना दिली. त्यानंतर फौजदार यांनी शिवीगाळ करणाऱ्या आपल्या पक्षाच्या महिलेला बोलावून घेत समज दिली, परंतु या महिलेने तिवारी यांना पुन्हा धमकावत तुम्हाला डोंबिवलीत राहायचे आहे की नाही असे दरडावले. त्याचवेळी राजन पांडे यानेदेखील पैशांच्या या प्रकरणाबाबत कोणी तक्रार केल्यास त्यांना मारले जाईल अशी धमकी दिली. या सर्व प्रकारचा तिवारी यांनी व्हिडीओ रेकॉर्ड केला असून मानपाडा पोलीस ठाण्यात पांडे याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.