भाजपात धुसफुस, मिंधेंचा असहकार; ठाण्यात विजयाची ‘मशाल’ धगधगणार

ठाणे विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे, भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव असा तिहेरी सामना रंगणार आहे. आधीच केळकर यांना पक्षातून आव्हाने मिळत असल्याने डॅमेज कंट्रोलसाठी त्यांची धावाधाव सुरू असतानाच जंग जंग पछाडल्यानंतरही ठाणे विधानसभेचा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे गेल्याने मिंधे गटातही कमालीची नाराजी आहे. त्यामुळे केळकरांविरोधात बंडखोरी आणि असहकार अशा भूमिकेत भाजप आणि मिंधे गट असतानाच निष्ठावंत शिवसैनिक, महाविकास आघाडीची एकजूट आणि ठाणेकरांचा विश्वास बळावर राजन विचारे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.

2014 आणि 2019 मध्ये भाजपचे संजय केळकर या मतदारसंघात विजयी झाले होते. मात्र मोठ्या अपेक्षेने त्यांच्या कार्यालयात येणारे ठाणेकर आणि पक्षातील कार्यकर्त्यांचीच कामे होत नसल्याच्या तक्रारी खुद्द भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून सातत्याने व्यक्त होत आहेत. त्यामुळे केळकरांविरोधात नाराजीचा सूरच मतदारसंघात उमटल्याचे चित्र आहे. त्यातच केळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविरोधात भाजपचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनीच बंडाचे निशाण फडकवत अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे पाटणकरांना शांत करण्यासाठी केळकरांना वरिष्ठ नेत्यांची मनधरणी करावी लागल्याचे सांगितले जात आहे. पाटणकरांनी तलवार म्यान केली असली तरी एकूणच मतदारसंघात खुद्द भाजपचेच कार्यकर्ते यंदा केळकर नको अशी कुजबुज करत होते. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी केळकरांची धावाधाव सुरू आहे.

मनसेचे अविनाश जाधव यांनी 2019 मध्ये केळकर यांच्याविरोधातच विधानसभा लढवली होती. त्यावेळी मनसेला 20 हजारांहून अधिक मतांनी पराभवाचा झटका बसला होता. त्यावेळी भाजपसोबत शिवसेनेची युती असल्याने केळकरांच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा होता. मात्र या निवडणुकीत होणाऱ्या तिहेरी लढतीत शिवसेनेची मशालच तेजाने तळपेल अशी प्रतिक्रिया ठाणेकरांमधून व्यक्त होत आहे.

मिंधे गटाचा नाराजीचा सूर

दुसरीकडे ठाणे विधानसभेतून आमदार संजय केळकर यांनी लोकसभा निवडणुकीत मदत केली नसल्याचा सूर मिंधे गटाने आळवला आहे. ठाणे मतदारसंघ हा मिंधे गटाला मिळावा यासाठी या गटाने गुडघ्याला बाशिंग बांधले. मात्र जागावाटपात तो पुन्हा भाजपकडे गेल्याने मिंधे गटाचे स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी केळकरांविरोधात उघड भूमिका घेतली. त्यामुळे पक्षातील नाराजी आणि मिंधे गटाचा छुपा असहकार याचा फटका केळकरांना बसेल असे चित्र सध्या ठाण्यात आहे.

राजन विचारे ‘हक्काचा माणूस’

शिवसेनेचे नगरसेवक, महापौर, आमदार आणि दोन वेळा खासदारपद भूषविलेले शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे विकासकामांच्या बळावर या निवडणुकीत सामोरे जात आहे. प्रतिकूल परिस्थितीत कडवी झुंज देऊन लोकसभेतील लढाईनंतर पुन्हा नव्या दमाने विचारे मैदानात उतरले आहेत. ठाणेकरांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारे आणि रात्री-अपरात्री अडीअडचणीला धावून जाणारे राजन विचारे हा ‘हक्काचा माणूस’ आहे अशी ठाणेकरांची भावना आहे.

ठाणेकरांचा विश्वास निष्ठावंत शिवसैनिकांची फौज, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, रिपाइं यांच्या भक्कम एकजुटीतून विचारे यांनी विजयाची मशाल पेटवण्याचा निर्धार केला आहे. लोकसभेत दुबार मतदानाचा कसा फटका बसला याचा जाहीर पंचनामा विचारे यांनी प्रशासनासमोर केला आणि त्यानंतर मतदारसंघातील दुबार नावे कमी करण्याची मोहीम सुरू झाली हे विचारे यांचे यश मानले जाते.