ऑनलाईन गेमचे वेड महागात पडले, उत्तर प्रदेशात तरुणाने 4 वर्षात 18 लाख रुपये गमावले

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऑनलाईन गेमने वेड लावले आहे. मात्र या वेडापायी तरुणाई काय करेल याचा नेम नाही. अशीच घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. ऑनलाईन गेमच्या नादापायी तरुण चार वर्षात 18 लाख रुपये हरला आहे. हे कर्ज चुकवण्यासाठी सासरच्यांकडून 6 लाख रुपये घेतले. मग चोरीचा बनाव केला. प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

उन्नावमध्ये राहणारा पवन हा गेल्या चार वर्षापासून फॅन्टसी गेमिंग अ‍ॅपवर ऑनलाईन गेम खेळत होता. या गेममध्ये आतापर्यंत तो सुमारे 18 लाख रुपये हरला होता. हे पैसे त्याने नातेवाईकांकडून उधार घेतले होते. ही उधारी चुकवण्यासाठी त्याने सासरच्यांकडून 6 लाख रुपये घेतले. मग हे पैसे चोरी झाल्याचा बनाव केला.

बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असताना वाटेत बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी आपल्याला लुटल्याचे पवनने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी सदर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अशी कोणतीच घटना घडली नसल्याचा खुलासा झाला.

पोलिसांनी पवनला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी पवन विरोधात खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.