गुजरातमध्ये खळबळ, राजकोटमधील 10 हॉटेल्सना बॉम्बने उडवण्याची धमकी

विमाने आणि शाळांनंतर आता हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये 5 स्टार हॉटेल्ससह 10 हॉटेल्सना बॉम्बने उडवण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. याप्रकरणी राजकोट पोलिसांनी तपास सुरू केला असून, मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

बॉम्बची धमकी मिळताच बॉम्बशोधक आणि राजकोट पोलिसांनी तात्काळ संबंधित हॉटेल्समध्ये धाव घेत तपासणी सुरू केली. इम्पिरिअल पॅलेस, सयाजी हॉटेल, सीजन हॉटेल आणि ग्रँड रिजन्सी हॉटेलचाही धमकीच्या मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

तिरुपतीमध्येही शुकवारी अनेक हॉटेल्सना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या ईमेलमध्ये ड्रग स्मगलिंग नेटवर्कचा कथित नेता जाफर सादिक याच्या नावाचा उल्लेख आहे. जाफरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि ईडीने अटक केली होती. धमकी मिळाल्यानंतर पोलीस आणि स्निफर श्वानांनी हॉटेलची झडती घेतली. मात्र कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही.