भाजपने केजरीवाल यांना मारण्याचा प्रयत्न केला, संजय सिंह यांचा आरोप

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रेदरम्यान हल्ला झाला. या हल्ल्यासाठी आपने भाजपला जबाबदार ठरवले आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मोठा दावा केला आहे. भाजप अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, ते अरविंद केजरीवाल यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे.

पश्चिम दिल्लीतील विकासपुरी येथे पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात याला. भाजपने पाठवलेल्या गुंडांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आपने केला आहे. दरम्यान आपचे खासदार संजय सिंह यांनीही भाजपवर निशाणा साधला. ‘तुरुंगात असताना अरविंद केजरिवाल यांचे इन्सुलिन बंद करण्यात आले. जेव्हा सुप्रिम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला तेव्हा ते AAP चा प्रचार करत होते. भाजप केंजरिवालांवर हल्ला करत आहे. तुमच्यात नेमका द्वेष तरी किती आहे? मात्र कितीही द्वेष असला तरी तुम्ही केजरीवाल यांना हरवू शकत नाही. म्हणूनच तुम्ही त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहात. असे संजय सिंह म्हणाले.

विकासपुरीत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी भाजपचे गुंड आले असून या घटनेत पोलिसांचाही हात आहे. असा गंभीर आरोप संजय सिंह यांनी केला. ‘हल्लेखोर रोहित सेहरावत हा दिल्ली भाजप युवा शाखेचा उपाध्यक्ष आहे. दुसरा हल्लेखोर अरुण ढल हा देखील भारतीय जनता युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे रोहित सेहरावत हा मुख्य आरोपी आहे. रोहित सेहरावतचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत फोटो देखील आहेत. दिल्लीतील भाजपचे अध्यक्ष सचदेवा या हल्लेखोरांचा बचाव करत आहेत. जर तुम्ही अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा जर त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला तर त्याला भाजप जबाबदार असेल, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे.

अरविंद केजरिवालांवर झालेल्या या हल्ल्यात अमित शहांच्या पोलिसांचा हात आहे. पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला झाला, त्यामुळे कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. सुरक्षेतील ही चूक कशी झाली? असा प्रश्न यावेळी  संजय सिंह यांनी उपस्थित केला.