परीक्षण – नाट्यतंत्राचा प्रदीर्घ अनुभव

> कुमार सोहोनी

नाटक हा थोडा कठीणसा साहित्य प्रकार आहे. फारच थोडे साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार, कवी उत्तम नाटककार म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. कुठलाही लेखक आपल्या कल्पनाशक्तीने कथा, कादंबरी, कविता यांची निर्मिती करीत असतो. वाचक ते एकटाच वाचून लेखकाने रंगवलेले भावविश्व आपल्या डोळ्यासमोर उभे करत असतो. पुस्तकरूपात असलेले नाटकदेखील वाचक वाचत असला तरी ते समूहाने पाहावे, ऐकावे, अनुभवावे या दृष्टीने लिहिणे अपेक्षित असते. त्यामुळे त्या नाटय़ लेखकाने लिहिलेले नाटक हे रंगमंचावर सादर होऊ शकेल असे असायला हवे. त्यासाठी त्याला एकंदरीत रंगमंचाच्या मर्यादांची एकूण कल्पना असायला हवी.

या नाटय़संग्रहातील ’मिशन व्हिक्टरी’, ’चाँद तारा’, ’संगीता फिरोज फडके’ या तीनही नाटकांतून लेखक महेंद्र कुरघोडे यांना नाटय़तंत्राची पुरेपूर जाण असल्याची प्रचीती येते. या तिन्ही नाटकांचे विषय हे वैश्विक, राजकीय, वैचारिक आहेत. परंतु लेखकाच्या ठायी असलेला नाटय़तंत्राचा प्रदीर्घ अनुभव, स्टेज क्राफ्टची सखोल माहिती यामुळे या तिन्ही नाटकांची प्रभावी मांडणी लेखकाला करता आली आहे. ही तिन्ही नाटके पुस्तकरूपाने जरी प्रकाशित होत असली तरी या नाटकांना महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेत प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे.

USSR चं विघटन झाल्यावर रशियाच्या अंगणात असलेल्या अनेक देशात सत्ता बदल झाले. अनेक देशात सशस्त्र क्रांतीला तोंड फुटले. त्यातीलच एक देश ’इस्तोनिया.’ ’इस्तोनिया लिबरेशन फ्रंट’ हुकूमशहा व सरंजामी प्युझोची सत्ता उलटवून टाकते. लोकशाही नैतिक मूल्य जपणारी सॅव्हियोची प्रेयसी स्टेला व तिचे वडील डॉ. डीएगो सॅव्हियोच्या सशस्त्र क्रांतीला सर्वार्थाने मदत करतात. या धकाधकीत डॉ. डीएगो यांना आपला जीव गमवावा लागतो. पुढील दोनच वर्षांत समाजवाद व साम्यवादाची भाषा करणाऱ्या सॅव्हियोची पाऊलं हुकूमशाहीकडे वळतात. परिणामी सॅव्हियोची प्रेयसी स्टेला ‘डॉ. डीएगो ह्युमन राइट फेडरेशन’ची स्थापना करते व सॅव्हियोच्या विरोधात इस्तोनियामधील जनतेचं जनमत जागं करते.

हुकूमशाही आणि साम्यवादाच्या अंधुकशा सीमारेषेवर घुसमटलेली सॅव्हियो व स्टेलाची प्रेमकथा ही शोकांतिका ठरते. ‘मिशन व्हिक्टरी’ हे परदेशी मातीवरचे नाटक तर ‘संगीता फिरोज फडके’ हे संपूर्णपणे भारतीय मातीतल्या आजच्या समस्येवरील नाटक. हे नाटक ‘लव जिहाद’ या अतिशय संवेदनशील विषयाशी निगडित आहे. ‘लव्ह जिहाद’ हा विषय पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की, यात गेल्या दशकांपासून आपल्या देशाच्या राजकारण व समाजकारणावर परिणाम करणारा वादग्रस्त मुद्दा आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली ज्या घटना समोर येत आहेत त्यात सत्य किती आणि राजकीय प्रयत्नांच्या हेतूने राबवला जाणारा अंजेडा किती? हा मुद्दा संगीता फिरोज फडके या नाटकात अधोरेखित करण्यात आला आहे. ‘लव्ह जिहाद’सारख्या अतिसंवेदनशील मुद्दय़ावर तटस्थपणे व नि:पक्षपातीपणे आपले विचार मांडणारं ‘संगीता फिरोज फडके’ हे नाटक वाचकाला विलक्षण नाटय़ानुभव देण्यात यशस्वी होतं.

‘चाँद तारा’ हे नाटक आणखी वेगळ्या पठडीतलं आहे. या नाटकाचा काळ हा पानिपत युद्धानंतरचा व आजचा आहे. या विषयावर नाटक सुचणे हेच विलक्षण आहे. 14 जानेवारी 1761 या दिवशी पानिपत येथे अब्दालीने 40,000 मराठा सैन्य कापून काढलं. 22000 मराठा युद्धकैद्यांना बलुचिस्तानमध्ये कलत नवाबाला गुलाम म्हणून विकलं. आज अडीचशे वर्षानंतरही त्याची 17 वी पिढी बलुचिस्तानमध्ये मुहाजीराचं लाजिरवाणं जिणं जगत आहे. त्यांची ओळख आहे ‘बुगटी मराठा’ हा थरारक इतिहास लेखक पहिल्या अंकात मांडतो, तर दुसऱ्या अंकात सांप्रतकाळात भारतीय रॉ इंटेलिजन्सने बलुचिस्तान रिपब्लिकन आर्मी व बुगटी मराठा यांना हाताशी धरून ग्वादरमधील म्जम् ला दिलेले हादरे. क्वैट्टाधील महंमद अली जिनाहांचा उद्ध्वस्त केलेला 25 फूट पुतळा, झैरतमधील जिनाहांची जाळलेली हवेली, हे प्रत्यक्ष रंगमंचावर दाखवून अडीचशे वर्षांच्या इतिहासाचा नाट्यमय पट रंगमंचावर साकार करण्यात लेखक पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

इतिहासाची सखोल जाणीव आणि वर्तमानाशी त्याची नाळ जोडणे हे महेंद्र कुरघोडे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ’मिशन व्हिक्टरी’, ’चाँद तारा’ व ’संगीता फिरोज फडके’ या तिन्ही नाटकांकडे नजर टाकली तर लेखकाची विविध विषय मांडण्याची भूक लक्षात येते. वेगवेगळ्या ईझमचा अभ्यास करता करता त्यावर भाष्य करता करता लेखकाला स्वतचा स्वतंत्र राजकीय विचार सापडलाय असे या तिन्ही नाटकांमधून सिद्ध होतं.

(लेखक सिने-नाट्य दिग्दर्शक आहेत.)

‘तीन नाटकं’
लेखक : महेंद्र कुरघोडे
प्रकाशक : अष्टगंध प्रकाशन
पृष्ठे : 163
मूल्य : : 300 रुपये