फिरस्ती – …आणि नायगरावर तिरंगा झळकला!

>> प्रांजल वाघ

न्यूयॉर्क राज्यातील, अमेरिका आणि कॅनडा यांच्या सीमेवरील  ‘नायगरा फॉल्स!’ धो धो कोसळणाऱया या जल प्रपाताचे आकर्षण जगभरातील समस्त पर्यटकांना असते. अशा या नायगरा धबधब्यावर 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपला तिरंगा झळकला. फिरस्ती अशा  अनोख्या क्षणांचे दान पदरात टाकते. त्याचेच हे शब्दातीत वर्णन.

साल होतं 2024. महिना होता ऑगस्टचा. या वर्षी मला कामानिमित्त चक्क अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. पहिला मुक्काम होता ‘न्यूयॉर्क’ शहरात. न्यूयॉर्क हे अमेरिकेतील सर्वात मोठे शहर मुंबईसारखी अमेरिकेची आर्थिक राजधानी आहे. न्यूयॉर्क येथील ‘लिबर्टी स्टॅच्यू’, ‘न्यूयॉर्क शेअर बाजार’, ‘ग्राऊंड झीरो स्मृतीस्थळ’ इत्यादी बरीच प्रेक्षणीय स्थळं पायी फिरून पाहिली. मेट्रोने चिक्कार प्रवास केला. तिथल्या असंख्य खाऊगल्ल्यांतील अगणित खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.

पण मला एका वेगळ्याच जागेला भेट देण्याची ओढ लागली होती. ती जागा होती न्यूयॉर्क राज्यातील, अमेरिका आणि कॅनडा यांच्या सीमेवरील ‘नायगरा फॉल्स’ची! कॅनडा येथील ‘ईरी’ जलाशयातून उगम पावणाऱया नायगरा नदीवर हे धबधब्याचं त्रिकुट शतकांपासून धो धो कोसळत आहे.  आता अमेरिकेत आलोय तर नायगरा पाहिलाच पाहिजे असं माझं मत होतं. पण आमच्या ग्रुपच्या वेळापत्रकात ते बसत नव्हतं. त्यात नायगरा धबधबा न्यूयॉर्क शहरापासून 658 किमी दूर. तिथे पोहोचायला बसने सात तास लागतात. त्यामुळे माझ्यासोबत यायला कोणी तयार होईना. मी मात्र हट्टाला पेटलो. 7 तास तर 7 तास! रोज रोज आपण काही अमेरिकेत येणार नाही. त्यामुळे आज संधी हुकली तर पुन्हा नायगरा कधी पाहणार? हा विचार केला आणि मी एकटय़ानेच नायगराच्या एक दिवसीय ग्रुप टूरचं तिकीट काढलं.

तारीख होती 15 ऑगस्ट – भारताचा स्वातंत्र्य दिन! भल्या पहाटे उठून मी निघालो. न्यूयॉर्कच्या ‘ऊग्से स्क्वेअर’ येथून या टूरच्या बसेस निघतात. या टूरमध्ये सहसा इंग्रजी, चायनीज किवा स्पॅनिशमध्ये बोलणारे गाईड असतात. आमची टूर इंग्रजी आणि स्पॅनिश असल्यामुळे आमच्या बसमध्ये अनेक देशांतील मंडळी होती. जपान, पोर्तुगाल, भारत, ब्राझील अशा अनेक देशातील माणसं आमच्या बसमध्ये होती. मला अशा टूर फार आवडतात, कारण इथे मला देशोदेशीच्या लोकांना भेटता येतं, त्यांच्याशी चर्चा होते. टूरच्या सुरुवातीला भेटलेले अनोळखी लोक, टूर संपेपर्यंत चांगले मित्र झालेले असतात.

सकाळी सात वाजता निघालेली आमची बस दोन-तीन थांबे घेत, नायगरा शहरात सुमारे दुपारी तीन वाजता पोहोचली. नायगरा शहरात प्रवेश करताच तुम्हाला धबधब्याची पहिली चाहूल लागते, कोसळणाऱया त्या जल प्रपाताची एक झलक तुम्हाला दिसते – हवेत उठलेले पाण्याच्या तुषारांचे लोट! जणू एखादं धुळीचं वादळ आणि त्या तुषारांच्या पडद्याआड तुम्हाला दिसतात काही उंच-उंच इमारती! या इमारती म्हणजे कॅनडामधील नायगरा शहरातील प्रतिष्ठित हॉटेल आणि कसिनो. अमेरिका आणि कॅनडा या दोघांची सीमारेषा म्हणजे या दोन्ही शहरांच्या मधून वाहणारी नायगरा नदी.

नायगरा स्टेट पार्कच्या प्रवेशद्वारावर आम्हाला आमचे गाईड भेटले आणि आम्हाला थेट घेऊन गेले ते ‘मेड ऑफ द मिस्ट’ नावाच्या एका भन्नाट बोटीवर. नायगरा येथे तीन धबधबे आहेत. अमेरिकन बाजूला आहे  ते ‘ब्रायडल वेल’ आणि ‘अमेरिकन फाल्स.’ पण नायगराच्या बाबतीत कॅनडा सर्वात भाग्यवंत ठरलाय, कारण नायगरा त्रिकुटीचा मुकुटमणी असलेला ‘हॉर्स-शू फाल्स’ हा कॅनडामध्ये येतो. घोडय़ाच्या नालेच्या आकाराचा हा अर्धवर्तुळाकार धबधबा म्हणजे नैसर्गिक चमत्कार आणि या स्थळाला मिळालेली दैवी देणगी आहे. ‘मेड ऑफ द मिस्ट’ ही पूर्णत विजेवर चालणारी बोट तुम्हाला थेट या तिन्ही धबधब्यांच्या अगदी जवळ घेऊन जाते. आम्ही वरच्या डेकवरील सर्वात अग्रभागी जागा निवडली आणि कॅमेरे सरसावून उभे राहिलो. थोडय़ाच वेळात या तिन्ही धबधब्यांच्या अगदी जवळ जाऊन आम्ही रेनकोट असूनही अगदी नखशिखांत भिजून गेलो. एक अविस्मरणीय अनुभव गाठीशी आला.

तितक्यात माझा फोन वाजला. माझ्या बहिणीने संदेश पाठवला होता. नायगरात रात्री प्रकाश खेळ चालतो. त्यात आज 15 ऑगस्ट! भारताचा स्वातंत्र्य दिन. त्यामुळे आज इथे ‘इंडियन इंडिपेंडन्स सेलिब्रेशन’ होणार होतं ज्यात धबधब्यावर तिरंगा झळकणार होता. आता उत्सुकता होती त्याच क्षणांची!

नायगराचा परिसर, तिथली नैसर्गिक संपत्ती आणि जैवविविधता पाहून घेतली. रात्रीचे भोजन आटपून घेतले. तिथल्या दुकानातून मनसोक्त खरेदी केली आणि नायगराच्या ऑब्जर्वेशन डेकवर जाऊन, जागा पकडून उभा राहिलो. घडय़ाळात रात्रीचे आठ वाजले आणि लगेच धबधब्यावर प्रकाश खेळ सुरू झाला. प्रत्येकाच्या हातातले मोबाइल सुरू झाले. चित्रफितींचं चित्रण सुरू झालं. समोर असलेला तो अद्भुत क्षण मनसोक्त उपभोगायचं सोडून मीसुद्धा काही वेळ मोबाइलने समोरचं दृश्य टिपत होतो. मग अचानक भानावर आलो. मोबाइल बाजूला ठेवून समोरच्या जादुई दृश्याचा आनंद घेऊ लागलो.

तितक्यात सिनेमाच्या पडद्यावरचं दृश्य बदलावं तसं कोसळणाऱया प्रपातावरचे रंग सरसर बदलले आणि नायगरा धबधब्यावर भारताचा तिरंगा झळकला! तिथे असलेल्या समस्त भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून गेला.आपल्या घरापासून हजारो मैल दूर, अमेरिका- कॅनडा सीमेवर येऊन, भारताच्या स्वातंत्र्य दिनी चक्क नायगरावर तिरंगा झळकलेला पाहण्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तिथे असलेलं कोणीच ते करू शकलं नसतं… आणि म्हणूनच की काय, पुढच्या पाच मिनिटांसाठी, नायगराच्या त्या मंतरलेल्या वातावरणात फटाक्यांची आतषबाजी अविरत सुरू होती. जणू आमच्या अव्यक्त भावना व्यक्त होत होत्या!

[email protected]