पुणे शहरातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची कारवाई; 60 जण ताब्यात, 1 लाखांची रोकड जप्त

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील खडक पोलीस ठाण्यापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या आणि शहरातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. येथून पोलिसांनी तब्बल 60 जणांना ताब्यात घेतले. तर, 1 लाख 2 हजार रुपये रोकड आणि 47 मोबाईल जप्त केले. याच भागात असलेल्या आणखी एका जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करून 3 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींवर खडक पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मटका किंग नंदू नाईक याच्या शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालय येथील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा टाकून 60 जणांना ताब्यात घेतले. नंदू नाईक हा मटका किंग म्हणून ओळखला जातो. त्याचे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्डे आहेत. पोलिसांकडून कारवाई केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे जुगार अड्डे काही दिवस बंद ठेवले जातात. मात्र, काही दिवसांतच पुन्हा सुरु होतात. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री येथे धाड टाकून तब्बल 1 लाखांची रोकड जप्त केली. तर, 60 जणांना ताब्यात घेतले. याच जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ऑगस्टमध्ये धाड टाकून कारवाई केली होती. त्यामुळे काही दिवसांतच परत येथे जुगार सुरू झाल्याचे दिसून येते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर देखील अनेक भागात छुप्या पद्धतीने हे व्यवसाय सुरू राहत आहेत. अनेक भागात स्पा सुरु आहेत. विशेषतः शहराच्या पूर्व भागात म्हणजेच परिमंडळ चार आणि पाचचा समावेश असलेल्या भागात हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

फरासखाना, स्वारगेटमध्येही प्रकार
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवार पेठ भागात गुन्हे शाखेने कारवाई करून जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. मात्र, यालाच लागून असलेल्या फरासखाना आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत छुप्या पद्धतीने असे प्रकार सुरू आहेत. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी कारवाई करून बदल्या केलेले कर्मचारी या भागात लक्ष घालत असल्याची माहिती आहे. असे असताना संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालतात का, असा सवाल उपस्थित होत आहे.