सृजन संवाद – विजेतव्या लंका

>> डॉ. समिरा गुजर जोशी

रामाने रावणावर विजय मिळवून लंका जिंकली, ती बिभीषणाला सोपवली आणि तो अयोध्येला परतला. अयोध्यावासीयांनी त्याचे स्वागत रांगोळ्या घालून व दिवे लावून केले म्हणून आपण दीपावली साजरी करतो असे जनमानसात रुजले आहे. वाल्मिकी रामायणात दिवाळीचा स्पष्ट उल्लेख नाही, पण आपल्याला दिवाळीची चाहूल लागलेली असताना जी लंका रामाने जिंकली, ती जिंकायला किती अवघड होती हे युद्धकांडातील तिसऱ्या सर्गातून जाणून घेऊ. याआधी आपण लंका हे कसे समृद्ध राज्य होते याविषयी जाणून घेतले आहे, पण युद्धाच्या दृष्टीने लंकेमध्ये रावणाने काय काय योजना करून तिला अजिंक्य बनवले होते हे या सर्गातील वर्णनातून आपल्या लक्षात येते.

एक प्रसिद्ध संस्कृत सुभाषित आहे, 

विजेतव्या लंका चरणतरणीयो जलनिधि।   

विपक्ष: पौलस्त्यो रणभुवि सहायाश्च कपय:। 

तथाप्येको राम:सकलमवधीद्राक्षसकुमं।

क्रियासिद्धि: सत्वे भवति  महतां नोपकरणे।। 

लंका जिंकायची होती, समुद्र चालत पार करायचा होता, रावणासारखा बलाढय़ शत्रू रणांगणावर समोर उभा ठाकला होता, सहाय्य करण्यासाठी केवळ वानर  होते, असे असतानाही एकटय़ा रामाने संपूर्ण राक्षसकुळाचा नाश केला. पराक्रमी लोकांची कार्यसिद्धी त्यांच्या ‘सत्वावर’ अवलंबून असते उपकरणांवर नव्हे. कितीही कमी साधने हाताशी असतील आणि परिस्थिती कितीही विपरीत असेल तरी स्वतःच्या सत्वामुळे ते विजय घडवून आणतात.

हनुमंताने सीता शोधासाठी लंकेला भेट दिली तेव्हा ती नुसतीच भेट नव्हती. सीतेला शोधून तिला आश्वस्त करणे हे तर काम होतेच आणि त्याचबरोबर ज्या लंकेवर स्वारी करायची तिचे निरीक्षण करणे हेही महत्त्वाचे काम होते. हनुमंताने ते किती उत्तम पद्धतीने बजावले हे युद्धकांडाच्या सुरुवातीला लक्षात येते.

चढाईची तयारी करण्याआधी प्रभू श्रीराम विचारतात, “लंका दुर्गम आहे असे आपण ऐकतो, नेमकी अवघड स्थळे कोणती आहेत?  येथे किती सैन्य आहे?  लंकेत प्रवेश करण्यासाठी किती प्रवेशद्वारे आहेत आणि तेथे नेमकी सुरक्षिततेची काय व्यवस्था आहे?” अलीकडे मिशनवर आधारित अनेक चित्रपट किंवा वेब सीरिज आपण पाहत असतो. त्यामध्ये ज्याप्रमाणे आधी प्लॅनची आखणी केली जाते, तसाच हाही प्रसंग आहे.

लंकेमध्ये सुरक्षिततेची सिद्धता अनेक प्रकारे करण्यात आली आहे, पण हनुमंत सगळ्यात आधी उल्लेख करतात तो राक्षसांमध्ये असलेल्या रावणाच्या लोकप्रियतेचा. लंकेमध्ये अतिशय समृद्ध असे राज्य रावणाने निर्माण केले आहे. या समृद्धीमुळे जनमानसात (राक्षस मानसात) त्याची प्रतिमा उंचावली आहे. त्याच्या विषयी त्याच्या प्रजाजनांच्या मनात आदर आहे ही बाब तो सगळ्यात आधी नोंदवतो. प्रजाजन नाराज असतील तर राजाला जिंकणे, फितुरी करवणे सोपे असते. ते इथे शक्य नाही. राजकारणाची हनुमंताची जाण येथे सुस्पष्ट आहे. प्रश्न लंकेतील सुरक्षा व्यवस्थेचा आहे, पण किल्ला किती अभेद्य आहे यापेक्षा लोकांची निष्ठा अभेद्य आहे का, यावर राज्याची सुरक्षितता ठरते. पुढे हनुमंतरायाने सांगितले की, विशालकाय समुद्र ओलांडणे हे तर आव्हान आहेच, पण लंकेपर्यंत पोहोचलो तरी लंकेत प्रवेश करणे सोपे नाही. प्रवेश करायचे चार मोठाले दरवाजे आहेत ज्यावर यंत्रे बसवलेली आहेत. या दरवाजांना बाहेरून उघडण्याचा प्रयत्न केला तर त्या यंत्रातून दगडांचा वर्षाव होतो. याच ठिकाणी शतघ्नी नावाच्या अस्त्राचाही उल्लेख झाला आहे. याचे नाव शतघ्नी आहे. कारण एकावेळी शंभर योद्धय़ांना गारद करण्याचे सामर्थ्य या अस्त्रात आहे. अशा शेकडो शतघ्नींची योजना प्रवेशद्वारापाशी करण्यात आली आहे. तसेच लंकेच्या सर्व बाजूला खंदक खोदण्यात आले आहेत. ज्याच्या पाण्यामध्ये हिंस्त्र मगरी, सुसरी सोडण्यात आल्या आहेत. या खंदकावर संक्रमसेतू म्हणजे पूल आहेत, पण ते कसे आहेत तर हे पूल उघडता वा बंद करता येतात. म्हणजे रावणाचे सैन्य आपल्या उपयोगासाठी ते पूल उपयोगात आणते, पण शत्रू आला की ते पूल काढून घेऊ शकते.

रावणाने सुरक्षिततेचा विचार किती वेगवेगळ्या अंगांनी करून ठेवला होता हे लक्षात येते. खरे तर समुद्र ओलांडून कोणी चाल करून येणे ही अवघड गोष्ट होती, पण निसर्गाचे सुरक्षा कवच लाभले असतानाही ही सतर्कता वाखाणण्यासारखी आहे. आपल्यालाही विस्तृत किनारा लाभला आहे आणि त्याचा फायदा शत्रूने कसा घेतला हे आपण अगदी नजीकच्या दहशतवादी हल्ल्यातही अनुभवले आहे. रावण मात्र सावध आणि सिद्ध आहे.

प्रभू रामांच्या रावणावरील विजयाचे मोठेपण इथे लक्षात येते. वरील सुभाषितात म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे अशी कोणतीही तयारी नव्हती, शस्त्रे नव्हती तरी त्यांनी लंका जिंकली ही त्यांची थोरवी. त्याविषयी पुढे जाणून घेऊ या.

[email protected]

 (निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)