नवी मुंबईत चार नवीन पोलीस ठाणे; उरणसाठी तिसरे परिमंडळ आयुक्तालयाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव

शैक्षणिक आणि आयटी हब अशी ओळख निर्माण केलेल्या नवी मुंबई शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण पडला आहे. हा ताण कमी करण्यासाठी शहरात चार नवे पोलीस ठाणे वाढवण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तयार केला आहे. त्यामुळे ऐरोली, करंजाडे, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि द्रोणागिरी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या चार पोलीस ठाण्यांबरोबर तिसरे परिमंडळ तयार करण्याच्या हालचाली पोलीस दलाने सुरू केल्या आहेत. हे परिमंडळ उरण विभागासाठी असणार आहे.

पोलिसांचा ताण कमी होणार
आंतरराष्ट्रीय विमानतळ, सागरी सेतू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे नवी मुंबई पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. लोकसंख्या मोठ्या वाढल्यामुळे सध्या उपलब्ध असलेले पोलीस बळ अपुरे पडत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी पोलीस ठाणे वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडू लागली आहे. त्यातच या ठिकाणी प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, सागरी सेतू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागरीकरणात सातत्याने मोठ्या प्रमाणात भर पडत आहे, पण वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत पोलीस बळ अपुरे पडू लागल्याने पोलीस बळावर प्रचंड ताण वाढू लागला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस दलाला पोलीस बळाची आणि पोलीस ठाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे परिमंडळ-३ निर्माण करून त्याअंतर्गत नव्याने दोन विभाग तयार करण्याचा तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर शहरात ऐरोली, करंजाडे, विमानतळ, द्रोणागिरी या नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार आहे. परिमंडळ-३ चा आणि नव्याने ४ पोलीस ठाणे सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे.