जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर थोरात समर्थक आक्रमक; वसंतराव देशमुख, सुधीर विखे पाटलांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

संगमनेर विधानसभा मतदारसंघात पारंपरिक विरोधक विखे पाटील घराणे आणि थोरात घराणे यांच्यातील राजकारण विकोपाला गेले आहे. विखे पाटील घराण्याशी संबंधित अडगळीत पडलेल्या गाव पुढाऱ्यांनी जाहीर भाषणांमधून थोरात यांच्या परिवारातील महिलांचा आणि विशेषतः मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात आणि राज्यात उमटू लागले आहेत. या वाचाळवीरांमुळे विखे पाटील घराण्याला नैतिकता राहिली आहे की नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

विखे पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य केले. जयश्री थोरात यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याने बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.

आता हे निवडणुकीचे राजकारण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले असून वसंतराव देशमुख आणि माजी खासदार डॉक्टर सुधीर विखे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज सकाळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात महिला व कार्यकर्त्यांना निषेध करण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात संवाद सभांचा धडाका लावला. मात्र या सभांमधून राजकीय भाषणे होण्याऐवजी अत्यंत खालच्या पातळीवरच्या टीका होऊ लागल्या. थोरात समर्थकांकडून आणि विशेषतः डॉक्टर जयश्री थोरात यांच्याकडूनही त्यास उत्तर देण्यात आले. त्यामुळे संगमनेर तालुक्यातले वातावरण तापू लागले होते. सुसंस्कृत राजकारणासाठी संगमनेर तालुका हा सुपरिचित आहे. या ठिकाणी येऊन संगमनेरची शांतता, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम विखे समर्थक आणि डॉक्टर सुजय विखे हे करीत असल्याचा आरोप होत आहेत.