अजितदादा गटाची भिस्त आयात उमेदवारांवर; नवाब मलिक वेटिंगवरच, वादग्रस्त सुनील टिंगरेंना उमेदवारी

अजित पवार गटाने सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीला  मदत केल्याचा आरोप असलेले आमदार सुनील टिंगरे यांना वडगाव शेरीतून उमेदवारी दिली आहे. तर माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांच्या गळय़ात उमेदवारीची माळ टाकली आहे.

अजित पवार गटाने त्यांच्या दुसऱ्या यादीत आयात उमेदवारांवर भिस्त ठेवली आहे. सातपैकी पाच उमेदवार हे दुसऱ्या पक्षातील आहेत किंवा मित्रपक्षांनी त्यांचे उमेदवार राष्ट्रवादीच्या गळय़ात मारले आहेत. भाजपचे सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना तासगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

सना मलिकला उमेदवारीचे बक्षीस

मानखुर्द शिवाजीनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या विद्यमान आमदार नवाब मलिक यांची राष्ट्रवादीने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यास विरोध होत असल्याने त्याबाबत पक्षाने निर्णय घेतलेला नाही. तर नवाब मलिक प्रतिनिधित्व करत असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघातून त्यांची मुलगी सना मलिक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

झिशान सिद्दिकींना प्रवेश करताच निवडणुकीचे तिकीट

काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाली होती. त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दिकी काँग्रेसमध्येच राहणार असल्याची चर्चा होती. मात्र झिशान यांनी आज अजित पवार गटात प्रवेश करताच त्यांना आजच उमेदवारी जाहीर करण्यात आली.

इस्लामपूर, लोहा मतदारसंघासाठी भाजपकडून उसनवारी

सांगली जिह्यातील इस्लामपूर मतदारसंघात डॉ. निशिकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनाही भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि आता अजित पवार गट असे पक्षांतर केलेल्या प्रताप चिखलीकर यांना लोहा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार शामसुंदर शिंदे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी हवी होती. चिखलीकर हे भाजपचे माजी खासदार आहेत. नुकत्याच पार लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांचा नांदेडमधून पराभव झाला होता.