वार्तापत्र रत्नागिरी – मिंधे गटाच्या पायाखालची वाळू सरकली; रत्नागिरीकर भगवा फडकवण्यासाठी सज्ज

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मिंधे गटातील गद्दारांना धडा शिकवू. मतदार संघावर भगवा फडकवण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मिंधे गटाचे उदय सामंत यांना महाविकास आघाडीचे अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळ माने टक्कर देणार आहेत. मतदारसंघात असलेले महाविकास आघाडीचे प्राबल्य पाहून मिंधे गटाच्या उदय सामंत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 89 हजार 964 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 41 हजार 556 पुरुष, 1 लाख 48 हजार 397 महिला मतदार आहेत आणि 11 तृतीयपंथी मतदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 4 हजार 440 आहे तर 80 वर्षे वयोगटावरील मतदारांची संख्या 8 हजार 539 आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 1 हजार 185 आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने तब्बल 10 हजारांचे मताधिक्य घेतले होते. महाविकास आघाडीला 84 हजार मते मिळाली होती, तर महायुतीला 74 हजार मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या मताधिक्यामुळे महायुती पराभवाच्या छायेखाली वावरत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल असलेल्या नाराजीचा फटका महायुतीला बसणार आहे.

उदय सामंत यांच्याविरोधात भूमिपुत्रांत संताप

रत्नागिरीतील रस्त्याचा प्रश्न, गेली 20 वर्षे रत्नागिरीचा खुंटलेला विकास, व्हेंटिलेटरवर असलेली आरोग्य यंत्रणा, उद्योग मंत्री असूनही गेल्या दोन वर्षांत एकही प्रकल्प आणू न शकलेल्या आणि प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्यात अपयशी ठरलेल्या उदय सामंतांबद्दल तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यात मिऱ्या एमआयडीसीमुळे स्थानिक भूमिपुत्र संतापलेले आहेत. अधिवेशन काळात बाहेर पडलेला डांबर घोटाळा, रत्नागिरीतील रखडलेले बस स्थानक यामुळे रत्नागिरीकर आता त्यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

बाळ माने यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा

महाविकास आघाडीकडून माजी आमदार बाळ माने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मतदारांकडून महाविकास आघाडीला पाठिंबा मिळत आहे. बाळ माने यांचा 39 वर्षांचा राजकीय अनुभव आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला नेटवर्कचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे.