वार्तापत्र निफाड, दिंडोरी – निफाड, दिंडोरीत महायुतीत रस्सीखेच

निफाड, दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. यामुळे तीनही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. निफाडमधून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी पुन्हा लढण्याची तयारी केली आहे. वरिष्ठांनीही त्यांना हिरवा पंदिल दाखवला होता. एबी फॉर्म आणि उमेदवारांच्या यादीत मात्र बनकरांचे नावच आले नाही. यामुळे ते टेन्शनमध्ये आहेत. दिंडोरीत अजित पवार गटाचे उमेदवार आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासमोर माजी आमदार शिंदे गटाचे बंडखोर धनराज महाले यांनी अर्ज दाखल केला आहे.

निफाड विधानसभेत मागील निवडणुकीत 24 हजार मते घेणारे यतीन कदम हे भाजपात दाखल झाले. त्या पक्षाकडून त्यांनी तयारी सुरू केली. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप बनकरांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असतानाच कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेत दावा केला. त्यांची बंडखोरी महायुतीच्या पराभवावर शिक्कामोर्तब करणारी ठरेल, याची खात्री असल्याने नाव जाहीर करण्याबाबत सावध पावले उचलली जात आहेत. यतीन कदम यांची दिशाभूल करून बनकरांना उमेदवारी देण्यासाठी अजित पवारांनी दोन दिवसांचा सर्व्हे करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात जो पुढे असेल त्याला उमेदवारी देऊ, असे सांगण्यात आले आहे. हा सर्व्हे कोणाच्या पथ्यावर पडतो अन् बंडखोरी टळते का, याकडे जनतेचे लक्ष वेधले गेले आहे. सर्व्हे हा निव्वळ डाव असून अजित पवार व फडणवीस यांच्यातच डाव-प्रतिडाव टाकून स्वतःच्या गटाकडे उमेदवारी घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे, अशी चर्चा आहे. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात असून प्रचारही ठप्प झाला आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनिल कदम यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे. सर्वत्र त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

महालेंनी वाढवले झिरवळांचे टेन्शन

दिंडोरी मतदारसंघातही महायुतीत तिढा कायम आहे. अजित पवार गटाकडून आमदार नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी आमदार धनराज महाले यांनी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला आहे, हे दोघेही जवळचे नातलग आहेत. आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर असून त्यांच्याच पक्षात आहोत, असे झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ यांनी अनेकदा जाहीर केले. अजित पवार आणि शिंदे या दोन्ही गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याने महायुतीत पेच वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीला विक्रमी मतदान झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी देईल तोच उमेदवार विजयी होईल हे स्पष्ट आहे.