पूर्व लडाखच्या सीमेवरून सैन्य माघारी घेण्यास सुरुवात

हिंदुस्थान आणि चीनने आजपासून पूर्व लडाखच्या सीमेवरून आपापले सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. पूर्व लडाखच्या डेमचोक आणि देपसांग पॉइंट येथे दोन्ही देशांच्या सैन्य दलाने तात्पुरते टेंट आणि शेड हटवले आहेत. गाडय़ा आणि शस्त्रास्त्र असलेली मिलिट्री उपकरणेही मागे घेण्यात येत असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. 28 आणि 29 ऑक्टोबरपर्यंत हिंदुस्थान आणि चीन देपसांग आणि डेमचोक येथून आपापले सैन्य पूर्णपणे हटवेल. त्यानंतर पेट्रोलिंग किंवा गस्त घालण्यासाठी मर्यादित सैन्य निश्चित करण्यात येईल. गस्त घालण्यासाठी किती सैनिक असतील याबाबत मात्र अद्याप निश्चिती करण्यात आलेली नसल्याची माहिती आर्मीच्या सूत्रांनी दिली.