5 कोटींची खंडणी! दिल्लीत 7 बोगस ईडी अधिकारी फरार

बनावट धाड टाकून एका व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात तोतया ईडी अधिकाऱ्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डीएलएफ फार्म परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकण्यात आली. जणू काही ईडीचे अधिकारी असल्याच्या आविर्भावात ही कारवाई करण्यात आली. व्यावसायिकाकडून पाच कोटींची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाहीत तर अटकेची धमकी देण्यात आली. मात्र व्यावसायिकाने हुशारीने आपल्या वकिलाशी संपर्क साधला. वकिलाने घटनास्थळी धाव घेऊन तोतया अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यानंतर आपण पकडले जाणार या भीतीने सर्वजण पसार झाले. त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

22 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास काही लोकांनी ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून बनावट धाड टाकल्याची माहिती दिल्ली पोलीस आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ही घटना दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर परिसरातील डीएलएफ फार्म्स येथील अशोका एव्हेन्यू येथे घडली.  या तोतय्या ईडी अधिकाऱ्यांनी संबंधित व्यावसायिकाला हौज खास येथील कोटक बँकेत नेले आणि त्याच्या बँक खात्यातून पाच कोटी रुपये काढण्यास सांगितल्याचेही दिल्ली पोलिसांना सांगण्यात आले. दरम्यान, व्यावसायिकाने याप्रकरणी ईडी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, 21 ऑक्टोबरच्या रात्री दोन गाडय़ांमधून काहीजण आले आणि त्यांनी आपण ईडीचे अधिकारी असल्याचा दावा केला होता. तसेच उद्या घरावर धाड टाकणार असल्याचेही म्हटले होते.

धाडीदरम्यान नेमके काय घडले?

तीन जण व्यावसायिकाशी बोलत होते, तर इतरांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. त्यांनी पीडित व्यावसायिकाला विचारले की ते रोज बँकेतून पैसे काढतात? त्यांनी व्यावसायिकाला काही जुने धनादेशही दाखवले आणि जर पाच कोटी दिले नाहीत तर त्याला अटक करण्याची धमकी दिली, मात्र पैसे दुसऱ्या दिवशी सकाळीच काढता येतील असे व्यावसायिकाने सांगितल्यामुळे सर्वजण रात्रभर व्यावसायिकाच्या घरीच राहीले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते व्यावसायिकाला बँकेत घेऊन गेले. यावेळी व्यावसायिकाने हुशारीने वकिलाला मेसेज केला आणि बँकेत बोलावून घेतले. वकील बँकेत पोहोचले आणि त्यांनी तोतया ईडी अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. अखेर आपण पकडले जाणार या भीतीने सर्वांनी तिथून पळ काढला.