शिवसेना 90, राष्ट्रवादी 90, काँग्रेस 90; मित्रपक्षांनाही मानाचे स्थान…,18 जागा सोडल्या

महाराष्ट्र विधानसभेच्या लढाईत महाविकास आघाडीची दमदार वाटचाल सुरू असून जागावाटपाबाबत पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष प्रत्येकी 85 ऐवजी 90 जागांवर लढणार आहेत, अशी माहिती आज काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. जागावाटपात इतर घटक पक्षांनाही मानाचे स्थान देण्यात आले असून उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना सोडण्याचे निश्चित झाले आहे, असे थोरात यांनी नमूद केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक आज झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, थोरात यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत घटक पक्षांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील ठेवण्यात आला तसेच उर्वरित उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. केंद्रीय निवडणूक समितीने काँग्रेस उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. उद्या  पुन्हा एकदा ऑनलाइन बैठक घेऊन यावर चर्चा केली जाईल व सर्व उमेदवार ठरतील, असे बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.  महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. महाराष्ट्रातील जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत आणि राज्यात बसलेले भ्रष्ट सरकार लोकच हटवणार आहेत आणि महाविकास आघाडीच्या हाती सत्ता देणार आहेत, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही

महाविकास आघाडीने तीन प्रमुख पक्ष प्रत्येकी 85 जागांवर लढणार असल्याचे सांगितले होते. बाळासाहेब थोरात यांनी आज दिल्लीत बोलताना हा फॉर्म्युला आता 90-90-90 झाल्याचे सांगितले. मित्रपक्षांना सोडलेल्या जागांमधून या प्रमुख पक्षांना काही जागा मिळू शकतात का, असे विचारले असता ती बेरीज अजून केलेली नाही, असे थोरात म्हणाले. महाविकास आघाडीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.