हिंदुस्थान-न्यूझीलंड हॉकी सामना बरोबरीत सुटला

सुलतान ऑफ जोहोर चषक स्पर्धेत हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. हिंदुस्थानच्या गुरजोत सिंग, रोहित आणि टी. प्रियवर्त यांनी प्रत्येकी एक गोल करून हिंदुस्थानला विजय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र न्यूझीलंडचा ड्रग फ्लिकर जॉण्टी एल्म्सने हॅटट्रिक ठोकत हिंदुस्थानच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरले.

हिंदुस्थान 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. हिंदुस्थानला अंतिम फेरी गाठण्यासाठी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतींवर सर्व समीकरण अवलंबून आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानने दमदार सुरुवात केली आणि सहाव्या मिनिटाला गुरजोतने गोल करून हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनी हिंदुस्थानला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र हिंदुस्थान त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयशी ठरला. न्यूझीलंडच्या एल्म्सने 17 व्या मिनिटाला न्यूझीलंडसाठी पहिला गोल केला. त्याच मिनिटाला रोहितच्या गोलच्या जोरावर हिंदुस्थानने पुन्हा आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात हिंदुस्थानने अनेक पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याचे प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये एल्म्सने न्यूझीलंडसाठी पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्याने 45 व्या मिनिटाला आणखी एक गोल केला आणि न्यूझीलंडची आघाडी 3-2 अशी वाढवली. हिंदुस्थानने 46 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली. त्यानंतर आठव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्यावर प्रियवर्तने गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत सोडवला.