Jammu and Kashmir – हिंदुस्थानी लष्कर अ‍ॅक्टिव्ह मोडवर, 130 दहशतवाद्यांची ओळख पटली, लवकरच कंठस्नान घालणार

जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या कारवायांमध्ये निष्पाप नागरीकांचा जीव जात असून सुरक्षा दलांचे जवानही शहीद झाले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कराने दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी योजना आखण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्याच्या घडली जवळपास 130 दहशतवादी सक्रिय आहेत. लवकरच त्यांना कंठस्नान घातले जाईल, असा इशारा लष्कराने दिला आहे.

जम्मूमध्ये सुरू असलेल्या चकमकींवरून हिंदुस्थानी लष्कराच्या उत्तरी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल सुचेंद्र कुमार यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, जम्मू, राजौरी, कठुआ, पुंछ, उधमपूर, डोडा आणि किश्तवाडा या भागांमध्ये बऱ्याच काळापासून शांतता होती. ही शांतता भंग झाली असून मागील 5 वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 720 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या, जम्मू काश्मीरमध्ये 120 ते 130 दहशतवादी सक्रिय आहेत. तसेच नवीन दहशतवाद्यांची भरती सध्या पूर्णपणे बंद आहे. लवकरच सक्रिय असणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या कमी करून त्यांचा संपूर्ण नायनाट केला जाईल, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे दहशतवाद्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराने योजना आखली आहे. त्या अनुषंगाने 600 नवीन ग्राम संरक्षण रक्षकांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील या रक्षकांना 10 हजार सेल्फ-लोडिंग रायफल सुद्धा दिल्या जात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये ही शस्त्र प्रभावी ठरणार आहेत. त्यामुळेच काही खासगी कंपन्यांसोबत लष्कराने करार करून त्यांचे सहकार्य घेतले आहे.