कुडाळ तालुक्यात भाजपला धक्का; कुंदे येथील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेची मशाल घेतली हाती

कुडाळ तालुक्यातील कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे. आमदार वैभव नाईक यांनी या कार्यर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. या कार्यकर्त्यांनी वैभव नाईक यांच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी शिवनेसेत प्रवेश करत असल्याचे सांगितले.

आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देत या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत. यापुढील काळातही ते कुंदे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. आमदार नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत कुंदे गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार नाईक यांनी ग्रामस्थांना दिला आहे.

कणकवली येथे आमदार नाईक यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी अनंत गावडे,अनिल खंदारे अशोक गावडे,अक्षय गावडे,विनायक गावडे,कृष्णा कासले या प्रमुख भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याची माहीती आमदार नाईक यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली. याप्रसंगी उपतालुकाप्रमुख सचिन कदम,उपविभागप्रमुख राजेंद्र घाडीगावकर,कुंदे सरपंच रुपेश तायशेटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.