रोजगार हेच आपले प्राधान्य; आदित्य ठाकरे यांचे जनतेला आश्वासन

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांना विजयी करण्याचे आवाहन केले. आता राज्यातील गद्दारांना गाडण्याची वेळ आली आहे. राज्यात आता घरोघरी मशाल पेटणे गरजेचे आहे. मशाल पेटली तर आणि तरच महाराष्ट्रातील अंधार दूर केल्याशिवाय आपण राहणार नाही, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरल्यानंतर आज पहिल्या ठिकाणी पाचोऱ्यात आलो आहे. पाचोऱ्यात आपले जवळचे नाते आहे. याआधी येथील काहीजण आपल्यासोबत होते. त्यानंतर ते सूरत, गुवाहाटीला पळून गेले. त्यांच्याबाबत आपल्याला काहीही बोलायचे नाही. फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभराच पन्नास खोके एकदम ओके, ऐकायला येत आहे. मात्र, एकाही निर्लज्ज गद्दारांनी आम्ही खोक्याला हात लावला नाही, असे सांगितले नाही. जे स्वतःला विकू शकतात, जे महाराष्ट्राला विकायला निघाले आहेत, ते आपल्यालाही विकू शकतात, हे आता लक्षात घेण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

आपले महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर आपण निष्ठा यात्रेदरम्यान येथे आलो होतो. त्यावेळी वैशालीताई म्हणाल्या होत्या, आम्ही उद्धवसाहेबांसोबत ठामपणे उभे आहोत, या मतदारसंघात आपला विजय होणार म्हणजे होणारच, आता त्यांचा शब्द खरा करून दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे याठिकाणी आपल्या विजय होणार हे निश्चित आहे, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि खोके सरकारची अडीच वर्षे यांची तुलना केली तर महाविकास आघाडीच्या काळात कोविडसारख्या जागतिक महामारीचे संकंट होते. या काळात जनतेसाठी काम केले, खरे सांगितले, कोणतेही आकडे लपवले नाही, राज्य आणि जनतेचे प्राण वाचवणारा मुख्यमंत्री म्हणून एकच नाव घेण्यात येत होते, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. जगभरात आपल्या महाराष्ट्र मॉडेलचे कौतुक होत होते. राज्यात असे संकट असतानाही आम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली. मात्र, खोके सरकारच्या काळात राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात पाठवण्यात आले.

स्वतःसाठी खोके घेत जनेतेला धोके देणाऱ्या खोके सरकारच्या काळात रोजगारनिर्मिती झाली नाही. तसेच राज्यातील उद्योगही बाहेरच्या राज्यात गेले. अशा प्रकारे राज्य चालवत असतानाही त्यांना लाज वाटत नाही. आपण सरकारमध्ये नसतानाही मुंबईत महारोजगार मेळाव्यात 12 हजार तरुणांना रोजगार देण्यात आला. सरकार नसताना आपण एवढे करू शकतो, तर आपले सरकार येणारच आहे, आपले सरकार आल्यावर दर तीन महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे घेण्यात येत तरुणांना रोजगार देण्यात येतील, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना सुरू ठेवत वाढीव रक्कम देऊ, तसेच सुरक्षित बहीण राहण्यासाठीही पावले उचलण्यात आहोत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरे यांनी पहिला निर्णय घेत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यांनी कोणतीही निवडणूक जवळ नसतानाही त्यांनी हा निर्णय घेतला. आम्हाला शेतीतील काही समजत नसेल. मात्र, आम्हाला शेतकऱ्यांचे दुःख, त्यांचे अश्रू त्यांच्या समस्या समजतात. त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. संविधान आणि लोकशाही रक्षणाची लढाई अजून सुरू आहे. त्यामुळे आता न्याय मागण्यासाठी आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. महाराष्ट्रसाठी ही लढाई सुरू आहे. आता गद्दारांनी गाडण्याची वेळ आली आहे. आता मशाल घरोघरी पोहचली पाहिजे. मशाल पेटली तर आणि तरच महाराष्ट्रातील अंधार दूर केल्याशिवाय आपण राहणार नाही, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.