डुप्लिकेट शिवसेना दिल्लीत उठाबशा काढत आहे, मिंधे शहांच्या दरवाजात बसले आहेत; संजय राऊत यांचा टोला

शिवसेना या नावाला कलंक लावण्याचे काम मिंधे करत आहेत. त्यांनी शिवसेना चोरली, स्वतःला ते डुप्लिकेट शिवसेनाप्रमुख म्हणवून घेत आहेत. मात्र, जागावाटपासाठी, प्रत्येक निर्णयासाठी त्यांना दिल्लीत उठाबशा काढव्या लागत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. याआधी भाजपचे नेते जागावाटपाच्या चर्चेसाठी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मुंबईत मातेश्रीवर येत होते. आता मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पळावे लागत असून अमित शहा यांच्या दरवाजासमोर ते तीन दिवस बसले आहेत, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांनी शिवसेना हे नाव कलंकित करत असल्याचे सांगत त्यांनी मिंध्यांची सालटी काढली.

स्वतःला शिवसेना म्हणवणारे दिल्लीत जाऊन उठाबशा काढत आहेत. शिवसेनेने हे कधीही केले नाही. जागावाटपासाठी, निर्णय घेण्यासाठी आम्ही कधीही दिल्लीत गेलो नाही. शिवसेना चोरणारे, स्वतःला शिवसेना डुप्लिकेट प्रमुख म्हणवणारे मुख्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत असून केंद्रीत गृहमंत्री अमित शहा यांच्या दरवाजात ते बसले आहेत. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. असे करून ते शिवसेना या नावाला कलंक लावत आहेत. एक काळ होता की, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे मुंबईत मातोश्रीवर येऊन चर्चा करत होते. मात्र, सध्याचे चित्र उलट असून मोठे गंमतीशीर आहेत. ते दिल्लीत चारपाच दिवस हिरवळीवर ताटकळत बसले आहेत, कधी होणार, काय होणार हे त्यांनाही माहिती नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

वरळी ही महत्त्वाची जागा आहे. तेथे स्वतः शिंदे यांनी उभे राहवे, त्यांच्याकडे उमेदवार नसतील, तर दिल्लीतील आयात करावेत, ही जागा लढवत त्यांनी जिंकून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधीही दिल्लीत जागा मागण्यासाठी गेलेले नाहीत, असे राऊत यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. शिंदे यांनी अशी विधाने करताना विचार करावा, त्यांनी बुद्धीला ताण देण्याची गरज आहे. दिल्लीची हवा सध्या प्रदूषित आहे. अशा प्रदूषित हवेत तीन चार दिवस असल्याने शिंदे यांची विचारशक्ती प्रदूषित झाली आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला.

महाविकास विकास आघाडीत सर्व ठरले असून सर्व झाले आहेत. आमचे मित्रपक्ष नाराज होणार नाहीत, एवढ्या जागा त्यांच्यासाठी सोडल्या जातील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एखाद्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार असू शकतात. तसेच एखाद्याने इच्छा व्यक्त करणे अयोग्य नाही. मात्र, एका व्यक्तीलाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात येतो. सुधीर साळवी नाराज नाहीत. कोणीही नाराज नसून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोठेही बंडखोरी होणार नाही, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.