पैठणला महायुतीत बंडाळी! भाजपचे डॉ. शिंदे यांची अपक्ष उमेदवारी

पैठण विधानसभा निवडणुकीतील मिंधे गटाचे उमेदवार विलास भुमरे यांच्या विरोधात आज भाजपचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीमध्ये बंडाचा झेंडा फडकावला आहे.

येथील संतपीठ इमारतीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे. आज पहिल्यांदाच २ उमेदवारी अर्ज भरण्यात आले. विहामांडवा येथील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा मिंधे गटाचे उमेदवार विलास भुमरे यांनी दुपारी १२ वाजता अर्ज दाखल केला. यानंतर लगेचच १२ वाजून २८ मिनिटांनी भाजपचे विधानसभा प्रचारप्रमुख तथा माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल मोगल, माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब सोलाट, प्रशांत आव्हाड, मुस्तफा पठाण, प्रहार संघटनेचे शिवाजी गाडे, अशोक कार्डीले, संतोष फासाटे, राजधर फसलें, सुरेश खराद, सूरज घुले, कृष्णा शिंदे, गोवर्धन नाटकर व प्रवीण धोडगे आदी कार्यकर्ते होते.

या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण औटे यांनी सांगितले की, पैठण येथील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ये हे मिंधे गटाच्या प्रचारापासून अलिप्त राहणार आहेत. महायुतीच्या सत्ताकाळात आम्हाला विश्वासात घेऊन कामे केली नाहीत. त्यामुळे हा पवित्रा घ्यावा लागला आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.