उमेदवार म्हणून येणार अन् गेम करणार! मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी

उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक म्हणून येणार आणि मनोज जरांगे पाटील यांचा गेम वाजवणार, अशी धमकी आल्यामुळे आंतरवाली सराटीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुकांचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये ही धमकी देण्यात आली असून पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. आंतरवाली सराटी येथे सध्या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. त्यामुळे गावात सध्या प्रचंड गर्दी आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका यूट्यूब चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये अज्ञाताने ‘उमेदवार म्हणून येणार आणि मनोज जरांगे यांचा गेम करणार’ अशी धमकी दिली आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून मुलाखतीसाठी येणारांनाही तपासणीला सामोरे जावे लागत आहे.

एका जातीवर जिंकता येत नाही, सर्वांना सोबत घेणार
सध्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. 29 किंवा 30 ऑक्टोबरला मतदारसंघ जाहीर करणार असून तेव्हाच उमेदवारही जाहीर करण्यात येतील, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. केवळ एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊनच विधानसभा लढवणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात मराठा-ओबीसी असा वाद नसल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असता तर आम्ही कशाला या भानगडीत पडलो असतो? पण देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ यांनी अडथळे आणले. ज्यांनी अडथळे आणले त्यांची पाडापाडी निश्चित असल्याचाही जरांगे यांनी पुनरुच्चार केला.