दाना चक्रीवादळामुळे 300 विमान उड्डाणे,552 रेल्वे फेऱ्या रद्द

बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले ‘दाना’ चक्रीवादळ आज पहाटे ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकेल. याचा तडाखा पश्चिम बंगाललाही बसणार आहे. त्यामुळे बंगालमधील सुमारे साडेतीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच तब्बल 300 विमान उड्डाणे आणि 552 रेल्वे फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांपासून किनारपट्टी भागात 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याचे चित्र आहे. ओडिशातील भितरकनिका नॅशनल पार्क आणि धामरा बंदराजवळ हे वादळ धडकण्याची शक्यता असून यावेळी भूस्खलन होऊ शकते, तसेच ओडिशाच्या उत्तरेकडील भागातून हे वादळ ताशी 120 किमी वेगाने पुढे सरकेल, असा अंदाज भुवनेश्वर हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळांवर आज सायंकाळी 5 वाजल्यापासून 25 ऑक्टोब रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजेच 16 तासांसाठी सुमारे 300 उड्डाणे रद्द करण्यात येणार आहेत. दक्षिण-पूर्व रेल्वेने 150 रेल्वेगाडय़ा रद्द केल्या आहेत, पूर्व कोस्ट रेल्वेने 198 गाडय़ा रद्द केल्या आहेत.

सात राज्यांना बसणार फटका

ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि तामीळनाडू या सात राज्यांना दाना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. ओडिशाने राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, ओडिशा आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाच्या 288 तुकडय़ा तैनात केल्या आहेत. 14 जिह्यांतील शाळा आणि महाविद्यालये 25 ऑक्टोबरपर्यंत बंद राहाणार आहेत. या जिह्यांतील सर्व पर्यटन उद्यानांसह ओडिशा उच्च न्यायालयही बंद ठेवले जाणार आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱयांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.