पुण्यात गांजा, दारूविक्रेते पोलिसांच्या रडारवर! गुन्हे शाखा; स्थानिक पोलिसांकडून मोहीम

पुणे शहर परिसरात गांजा आणि अवैधरित्या गावठी दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत. हा पुर्ण आठवडा गुन्हे शाखेची पथके गांजा विक्रेते तर, स्थानिक पोलिसांकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात होणारी तंबाखू विक्री, उघड्यावर दारू पिणार्‍यांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

शहर परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची आवक होत असून छुप्या पद्धतीने हा गांजा पुरविला जातो. यापुर्वी वेळोवेळी कारवाई करून पोलिसांनी लाखोंचा गांजा जप्त केला आहे. मात्र, त्यांची चैन तोडण्यास पोलिसांना अपयश येत असल्याने शहरात अनेक ठिकाणी सहजरित्या गांजा उपलब्ध होतो. तर, शहरालगतच्या भागात अवैधरित्या गावठी दारू विक्रीचे प्रमाण मोठे आहे. लोणीकंद, लोणी काळभोर या भागातून गावठी दारू शहरात येत असल्याचे यापुर्वी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. शहरात गांजा, गावठी दारूच्या वाढत्या पुरवठ्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. नूकत्याच बोपदेव घाट परिसरात झालेल्या सामूहीक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी अत्याचार करण्यापुर्वी दारूचे सेवन केले होते. त्यानंतर ते गांजाही प्यायले. यामुळे शहरात सहजरित्या उपलब्ध होणार्‍या गांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलीस आयुक्तांच्या सूचनेनूसार गुन्हे शाखेने गांजा विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. हा संपुर्ण आठवडा गुन्हे शाखेची पथके शहरातील विविध भागात गांजा विक्रेत्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. तर, स्थानिक पोलिसांकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.

….उघड्यावर दारू अन् अल्पवयीन

शहरातील अनेक भागात सार्वजनिक ठिकाणी टोळके दारू पित बसत असल्याचे चित्र दिसते. अनेक बारमध्ये अल्पवयीनांना दारू पुरविली जाते. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अशा बारचालकांना सूचना देण्यात आल्या असून अल्पवयीनांना दारू दिल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. याशिवाय शाळा महाविद्यालयांच्या आवारात मिळणार्‍या तंबाखूजन्य पदार्थांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

शहरातील गांजा विक्रेते, गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानूसार आठवडाभर विशेष मोहीमेंतर्गत गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांकडून ही कारवाई केली जाणार आहे.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे.