मुंबईतील घडामोडी

पीजीपीडीएमसाठी अर्ज सुरू

भारतीय विद्या भवनचे एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चने 2026 च्या क्लाससाठी त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन डेव्हलपमेंट मॅनेजमेंटसाठी (पीजीपीडीएम) अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. फेब्रुवारीपासून या रौप्यमहोत्सवी बॅचला सुरुवात होईल. इच्छुक मान्यताकृत युनिव्हर्सिटीमधून कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा, किमान दोन वर्षांचा संबंधित पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा, संगणकामध्ये मूलभूत प्राविण्य असावे अशा काही अटी आहेत. अधिक तपशील 022-62134444 या क्रमांकावर संपर्क साधा.

महामुंबई शिक्षण संस्थेची सभा

महामुंबई शिक्षण संस्था संघटनेच्या संस्था चालकांची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता विकास हायस्कूल सभागृह, कन्नमवार नगर-2, विक्रोळी पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला विशेष आमंत्रित म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल-पाटील, डॉ. प्रकाश पाटील असे मान्यवर उपस्थित राहून विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करतील. तरी संघटनेच्या सर्व सदस्यांनी व मुंबई, ठाणे येथील संस्थाचालकांनी सभेत उपस्थित राहावे, असे अवाहन कार्यवाह डॉ. विनय राऊत यांनी केले.

विलेपार्लेत आकाशकंदील प्रदर्शन

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या वतीने दिवाळीनिमित्त किल्ले आणि आकाशकंदील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश स्कूलच्या मैदानावर होणार आहे. पालकांसह इतर नागरिकदेखील बच्चेकंपनीसह या प्रदर्शनाला भेट देऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय फ्लोरा एक्स्पो

सतरावा आंतरराष्ट्रीय फ्लोरा एक्स्पो 25 ते 27 ऑक्टोबरदरम्यान गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात होणार आहे. ग्रोअर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवंगत रतन टाटा यांना समर्पित पुष्पांजली अर्पण करून या शोची सुरुवात होणार आहे. हॉलंड आणि यूकेमधील प्रतिष्ठत प्रतिनिधी तसेच प्रख्यात बॉलीवूड सेलिब्रेटी, पर्यावरण संवर्धनासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी एकत्र येतील. या कार्यक्रमास पालिकेचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा

भंडारी समाजाचे मुखपत्र ‘हेटकरी’ मासिक गेली 85 वर्षे प्रकाशित होत आहे. नोव्हेंबर 2024 चा अंक दिवाळी विशेषांक म्हणून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्ञातीबांधवांना कथा, लघुकथा, गोष्ट, कविता लवकरात लवकर [email protected] या इमेल वर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.