विलेपार्ल्यात रंगला अशोक मुळ्ये यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये म्हणजे नाट्यक्षेत्रातील एक वल्ली व्यक्तिमत्त्व. जे परखड आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. अशोक मुळ्ये ऊर्फ मुळ्येकाकांनी नुकतीच वयाची 80 वर्षे पूर्ण केली. यानिमित्त रविवार, 20 ऑक्टोबर रोजी विलेपार्ले येथे सहस्रचंद्रदर्शन सोहळा पार पडला. गजाली हॉटेलात रंगलेल्या या सोहळ्याला अशोक मुळ्ये यांचे चाहते, हितचिंतक उपस्थित होते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, एकपात्री कलाकार केदार परुळेकर, उद्योगपती महेश मुद्दा, सीए विनायक गवांदे, अ‍ॅड. संजीव सावंत, श्रीकांत चौधरी, मनोज चौधरी, भास्कर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. गजाली हॉटेलचे मालक मधू शेट्टी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.

अशोक मुळ्ये अनेक दशके नाट्य व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहेत. मुळ्येकाका म्हणजे हटके कार्यक्रमांची संकल्पनाच जणू. त्यांच्या संकल्पनेतील अनेक कार्यक्रम गाजले. मग नाटककारांचे संमेलन असो किंवा ‘माझा पुरस्कार’ असो. ‘सब कुछ मुळ्येकाका’ असे त्यांच्या कार्यक्रमांचे स्वरूप असते. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे.