वॉचमनना इलेक्ट्रिक शेगडी देणे कंत्राटदारांना बंधनकारक, शेकोटीचे प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय

प्रातिनिधीक फोटो

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचे प्रदूषण वाढले असून हिवाळ्यात यामध्ये वाढ होण्याचा धोका आहे. त्यामुळे हिवाळ्यात शेकोटीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वॉचमनना इलेक्ट्रिक शेगडी देणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या नियमावलीत सुधारणा करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे.

वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणची धूळ प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने गेल्या वर्षी प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईत सहा हजारांवर ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नियम मोडणाऱ्यांवर पालिकेकडून ‘स्टॉप वर्क’ अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे.

अशी आहे नवी नियमावली

  1. एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे.
  2. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी प्रिंक्लर असावेत. धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान चार ते पाचवेळा पाण्याची फवारणी करावी. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अँटी स्मॉग मशीन लावावीत.
  3. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या संरक्षणासाठी मास्क, चष्मा आदी संरक्षण साहित्य दिले जावे.
  4. डेब्रिज वाहतूक करणारे वाहन झाकलेले असावे. डेब्रिज ने-आण करताना, प्रत्येक खेपेच्या वेळी तुषार फवारणी करावी. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावे.