Maharashtra Assembly Election 2024 – मावळमध्ये महायुतीमध्ये फूट; भाजपने दिला अपक्षाला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच भाजपमध्ये नाराजीचे फटाके फुटले आहेत. मावळमधून सुनील शेळके यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी थेट अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महायुतीत पुणे जिल्ह्यात फूट पडली आहे. जुन्नरमध्ये अतुल बेनके, खेड आळंदीतून दिलीप मोहिते पाटील या उमेदवारांना त्या मतदारसंघात भाजपने तीव्र विरोध केला आहे, तर अजित पवार गटाच्या उमेदवारांविरोधात भाजपनेच सर्वपक्षीय एकच उमेदवार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अजित पवारांची गोची झाली आहे.

अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार असून जिल्ह्यातील मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांची उमेदवारी होल्डवर ठेवली आहे. उमेदवारांची यादी घोषित होताच भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. मावळचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना भाजपने तीव्र विरोध केला. अजित पवार गटाचे इच्छुक बापू भेगडे यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा फेकून दिला. पाठोपाठ अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्यानंतर सायंकाळी भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातून भाजपचा पाठिंबा बापू भेगडे यांना जाहीर केला. त्यामुळे महायुतीत दरार निर्माण झाली असून त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. जुन्नर आणि खेडमधूनही भाजप कार्यकर्त्यांनी विरोध सुरू केला आहे.

वडगावशेरीचा सस्पेन्स कशासाठी?

पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघाचे यादीत नाव नाही, मात्र आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, आज जाहीर केलेल्या यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट नाही. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे जाणार का? तसेच पोर्शे कार प्रकरणात टिंगरे यांचा संबंध असल्याने यादीला गालबोट लागू नये म्हणून टिंगरेंचे नाव थांबविले किंवा कसे, याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.