पालिका प्रशासनाने हंगामी कर्मचाऱ्यांची 1 हजार 832 पदे रद्द केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत असणारी 52 हजार 221 शेड्युल्ड पदे भरली जात नाहीत तोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे रद्द न करता त्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
मुंबई महानगरपालिका मुंबईतील सुमारे सव्वा कोटी जनतेला नागरी सेवा पुरविण्याचे काम करते. मुंबईतील जनतेला विविध नागरी सेवा पुरविण्यासाठी जे विभाग/ खाती / रुग्णालये कार्यान्वित आहेत. त्या ठिकाणी कामगार, कर्मचारी, अधिकारी किती असावेत याचा अभ्यास करून, रचना व कार्यपद्धती विभागाने शेड्युल्ड पदे निर्माण केलेली आहेत. शेड्युल्ड पदांवरील कर्मचारी योग्य पद्धतीने नागरी सेवा देण्याचे काम अविरतपणे करीत आले आहेत.
मागील काही वर्षांपासून सेवानिवृत्ती, निधन व अन्य कारणांमुळे रिक्त होणारी वरील शेड्युल्ड पदे भरली न गेल्याने तब्बल 52,221 शेड्युल्ड पदे रिक्त झालेली आहेत. रिक्त पदांमुळे नागरी सेवेवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदांच्या सापेक्ष हंगामी/कंत्राटी/रोजंदारी बहुउद्देशीय इ. कामगारांकडून कामे करवून घेण्याचे काम पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
मात्र ही पदे रद्द केल्याने नागरी सुविधा, आरोग्य सुविधेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे ही पदांच्या नियुक्त्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण करावे आणि शासनाच्या धोरणानुसार रिक्त पदी सामावून घ्यावे, अशी मागणीही म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून करण्यात आली आहे. याबाबत अध्यक्ष बाबा कदम, उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.