बंगळुरूतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा सातवर, इमारत उभारणाऱ्या कंत्राटदारासह तिघांना अटक

मुसळधार पावसामुळे बंगळुरूत निर्माणाधीन इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. बचावकार्य सुरू असताना आज इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी सहा कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना मंगळवारी ही इमारत कोसळली. तेव्हापासून अग्निशमन आणि आपत्कालीन विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे.

इमारत उभारणारा भुवन रेड्डी आणि त्याचा मुलगा मुनीराजा रेड्डी तसेच कंत्राटदार मुनीयप्पा या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. केवळ चार मजल्याची इमारत बांधण्याची परवानगी असताना तब्बल सात मजल्याची इमारत उभारण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी ढिगाऱ्याखालून एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. आज आणखी सहा मृतदेह हाती लागले.

निसर्गाला रोखू शकत नाही – उपमुख्यमंत्री

इमारत दुर्घटनेवरून कर्नाटकात राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्ष जेडीएसने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुबई आणि दिल्लीत काय चालले आहे हे तुम्ही पाहिले असेलच. देशाच्या अनेक भागांत हीच स्थिती आहे. आपण निसर्गाला रोखू शकत नाही; परंतु आपण व्यवस्थापन करत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.