झिम्बाब्वेचा विक्रमांचा पाऊस, सिकंदर रझाचे 33 चेंडूंत शतक

झिम्बाब्वेने गाम्बियाविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप पात्रता फेराच्या लढतीत अक्षरशः विश्वविक्रमांचा पाऊस पाडला. सिकंदर रझाने झिम्बाब्वेसाठी टी-20 क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक ठोकताना अनेक विक्रम मोडीत काढले. एवढेच नव्हे तर झिम्बाब्वेने 4 बाद 344 अशी विश्वविक्रमी धावसंख्या उभारताना गाम्बियाचा 290 धावांनी पराभव करत सर्वात मोठय़ा विश्वविक्रमी विजयाची नोंदही केली.

आज झिम्बाब्वेने नैरोबीच्या रुआरका स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर एकापेक्षा एक विश्वविक्रम रचले. सिंकदरने आपल्या 43 चेंडूंत 15 षटकार आणि 7 चौकार लगावत 133 धावांची घणाघाती खेळी साकारली. रझाला 27 चेंडूंतील साहिल चौहानच्या वेगवान शतकाचा विक्रम मोडता आला नसला तरी तो दुसरा वेगवान शतकवीर ठरला. या आधी नामिबियाच्या यान निकोल लॉफ्टी एटननेही 33 चेंडूंत शतक साकारले होते. आज त्याची बरोबरी रझाने साधली.

तसेच ताडीवनाशे मरुमनीने 13 चेंडूंत पन्नाशी ओलांडताना 19 चेंडूंत 62 धावा केल्या. ब्रायन बेनेटनेही 26 चेंडूंत 50 तर क्लाइव्ह मडांडेनेने 17 चेंडूंत 53 धावा पह्डून काढल्या. या झंझावाती खेळींमुळे झिम्बाब्वेने टी-20 मधील 344 ही सर्वोच्च धावसंख्या उभारली. या फटकेबाजीमुळे एका डावात सर्वाधिक 27 षटकारांचाही नवा विश्वविक्रम रचला गेला.

त्यानंतर झिम्बाब्वेने दुबळय़ा गाम्बियाचा डाव 54 धावांत गुंडाळत 290 धावांचा महाविजयही नोंदविला. झिम्बाब्वेच्या रिचर्ड एनगरावा आणि ब्रॅण्डन मवुता यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट टिपल्या.