अंबरनाथ – बदलापूर स्थानकादरम्यान तरुणीचा हात निसटला, लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकादरम्यान कर्जत लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नसताना तरुणी रेल्वेत चढली. मात्र ती दारातच उभी होती. दरम्यान तिचा हात सुटला आणि ती ट्रॅकवर पडल्यामुळे गंभीर जखमी झाली. दरम्यान तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात घडला. ऋतुजा गणेश जंगम (25) असे या तरुणीचे नाव असून ती कर्जतमधील म्हाडा कॉलनी येथे राहणारी रहिवाशी होती. मंगळवारी रात्री जॉबवरून घरी जात असताना ऋतुजाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास जवळपास सर्वच लोकल गाड्या कल्याणहून कर्जत आणि कसाराच्या दिशेने उशिराने धावतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी तिने अंबरनाथ स्टेशनवरून कर्जत लोकल पकडली. मात्र लोकलला गर्दी असल्यामुळे ती दारातच उभी राहिली होती. दरम्यान अंबरनाथ स्टेशन सोडल्यानंतर तिचा हात सुटला आणि ती ट्रॅकवर पडली.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.