किन्हवलीच्या विद्या प्रसारक मंडळाच्या लाचखोर संचालकाला बेड्या

किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकाची रोखण्यात आलेली वेतनवाढ पूर्ववत करण्यासाठी लाच मागणाऱ्या संस्थेच्या संचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चंद्रकांत धानके असे या लाचखोर सहसचिवाचे नाव असून विद्यालयाच्या बाहेर पैसे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

किन्हवलीतील विद्या प्रसारक मंडळाचे धानके हे संचालक तथा सहसचिव असून त्यांनी संस्थेच्या सोगाव विभाग माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अनंता विशे यांच्याकडून दोन वर्षांची वेतनवाढ पूर्ववत करून थकीत रक्कम काढण्यासाठी एक लाख दहा हजारांची लाच मागितली होती. याबाबत संबंधित शिक्षकाने ठाणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार किन्हवली येथील विद्यालयासमोरच असलेल्या बसस्थानकाजवळ शिक्षकाकडून पैसे घेताना धानके यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

हाव काही संपतच नव्हती

सोगाव विभाग माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अनंता विशे यांच्याकडून यापूर्वीही काही रक्कम व काही वस्तूरुपातील मदत धानके यांनी घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र त्यानंतरही हाव न संपलेले धानके हे वारंवार विशे यांच्याकडून पैसे उकळत होते. त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या या शिक्षकाने अखेर तक्रार करण्याचा निर्णय घेतला.