सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलीस कोठडी

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबई येथील घरावर गोळीबार करून हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य आरोपीला आज न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुखबीर सिंग ऊर्फ सुरण्या शूटर असे त्याचे नाव असून तो बिष्णोई गँगचा हस्तक आहे. पनवेल पोलिसांनी त्याला हरियाणातील पानिपत येथून अटक केली होती.

सुखबीर सिंग हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून साथीदारांना पैसे व हत्यारे पुरवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने स्वतः सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसची रेकी केली होती. तसेच सलमान खानला रस्त्यात अडवून त्याला ठार करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात त्याचे आणखी कोण साथीदार सहभागी आहेत का? त्याचा आणखी काही प्लॅन होता का? याचा शोध घेण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने 25 ऑक्टोबरपर्यंत सुखबीर सिंगच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.