अनिल देशमुख ऐन निवडणुकीत बॉम्ब फोडणार, भाजप, देवेंद्र फडणवीसांच्या षडयंत्राचा होणार पर्दाफाश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख ऐन निवडणुकीत बॉम्ब फोडणार आहेत. त्यांच्या ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी रचलेल्या षड्यंत्राचा या पुस्तकातून पर्दाफाश होणार आहे. अनेक धक्कादायक तथ्ये या पुस्तकातून उलगडणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात खोटे शपथपत्र देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्यावर दबाव आणला होता आणि ते न दिल्याने आपल्याला तुरुंगात टाकले गेले असा आरोप अनिल देशमुख यांनी यापूर्वी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी रचलेल्या कटकारस्थानांचा उलगडा देशमुख यांनी या पुस्तकातून केला असल्याचे सांगण्यात येते.

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्यावर 100 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शपथपत्र लिहून देण्यासाठी फडणवीसांचा एक खास माणूस आपल्याला अनेकदा भेटला होता, असा खळबळजनक आरोप अनिल देशमुख यांनी मध्यंतरी केला होता. आता देशमुख या पुस्तकाद्वारे नवा गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगण्यात येते.

अनिल देशमुख 14 महिने तुरुंगात होते. त्यावेळी अनेक वृत्तपत्रांची कात्रणे व अनेक संदर्भ त्यांनी गोळा केले होते. तुरुंगात असतानाच त्यांनी पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली होती आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुस्तकाला अंतिम स्वरूप दिले. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये हे पुस्तक असणार आहे. “मला अडकविण्यासाठी कोणी व कसे षड्यंत्र रचले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करीत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडायचे कसे आणि त्यासाठी कोणाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. काही चुकीची माहिती जनतेसमोर येत असल्याने या पुस्तकाच्या माध्यमातून आपण सत्य जनतेसमोर आणणार आहोत,’’ असे अनिल देशमुख यांनी सांगितले.