देशभरातील महत्वाच्या घडामोडी

ट्रेनरची फसवणूक; एकाला अटक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ट्रेनरच्या फसवणूकप्रकरणी एकाला वनराई पोलिसांनी अटक केली. उदय झा असे त्याचे नाव आहे. त्याने त्याचे बँक खाते ठगाला वापरण्यास दिले होते. बँक खात्याच्या मोबदल्यात त्याला महिन्याचे रेशन भरून दिले होते अशी माहिती तपासात समोर आली होती. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

अंधेरीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अंधेरी येथील सेक्स रॅकेटचा डी. एन. नगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाई करून तीन तरुणीची सुटका केली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश होता. या प्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

अल्पवयीन मुलावर अत्याचार

डोंगरी येथील बालनिरीक्षणगृहात 17 वर्षांच्या मुलावर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरून डोंगरी पोलिसांनी 16 वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक शोषणाच्या तक्रारीत कितपत तथ्य आहे याचा पोलीस तपास करत आहेत. अत्याचार करणाऱ्या 16 वर्षांच्या मुलाने तोंडात पांढऱ्या रंगाची पावडरही कोंबल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अठरा वर्षांनी केले गजाआड

पार्सलच्या नावाखाली फ्लॅटमध्ये घुसून जबरी चोरी करून हल्लाप्रकरणी एका फरारी आरोपीला अठरा वर्षांनी दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रमजान नसरुद्दीन ऊर्फ मुस्ताक शेख असे त्याचे नाव आहे. मालाडच्या इराणीवाडी येथे महिला राहते. तिचे तेथील एका इमारतीमध्ये दोन फ्लॅट आहेत. 2006 साली त्या घरी होत्या. तेव्हा सकाळी एक जण पार्सल देण्यासाठी तेथे आला होता. पार्सलच्या बहाण्याने त्याच्या सोबत असलेल्याने महिलेच्या पतीवर हल्ला करून त्याला जखमी केले होते.

धर्मनिरपेक्षता म्हणजे जगा आणि जगू द्या

धर्मनिरपेक्षता म्हणजे जगा आणि जगू द्या. मदरसा ऍक्ट नियमित करून तसेच अल्पसंख्याकांसाठी अशाप्रकारे कायदा करून या देशात शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या संमिश्र संस्कृतीला दूर करता येणार नाही. आपल्याला या देशातील व्यापक दृष्टिकोन जाणून घ्यायला हवा, अशा शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज उत्तर प्रदेश सरकारला सुनावले. दरम्यान, मदरसा अ‍ॅक्ट लागू करणे हा काही राष्ट्रीय इंटरेस्ट आहे का? असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला केला.

अनंत धनसरे यांची कविता विद्यापीठात अभ्यासली जावी, शामल गरुड यांचे प्रतिपादन

साहित्याच्या प्रस्थापित भिंतीवर बसून साहित्याचे मोजमाप करणाऱ्या व्यवस्थेला कवी अनंत धनसरे यांच्या ‘एक सत्य’ या दीर्घ कवितेची दखल घ्यावीच लागेल. ही कविता वरवरचे बोलत नाही तर जमिनीखालचा तळ ढवळून अनुभवातून उभी राहते आणि म्हणूनच ही कविता विद्यापीठात बसून अभ्यासली जावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. शामल गरुड यांनी केले. घाटकोपर येथे माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शहीद स्मारक सभागृहात कवी अनंत धनसरे यांच्या ‘एक सत्य’ दीर्घ कवितेच्या प्रकाशन सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी शिवा इंगोले, डॉ. सुनील पवार, रविकिरण पराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महारेराच्या सलोखा मंचाद्वारे 1749 तक्रारींचा निपटारा

महारेराने घर खरेदीदारांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवण्यासाठी गठीत केलेल्या सलोखा मंचानी राज्यातील 5958 प्रकरणांपैकी 1749 घर खरेदीदारांच्या तक्रारी यशस्वीपणे निकाली काढल्या आहेत. यात मुंबईतील 562, पुणे 530, ठाणे 201, नवी मुंबई 169, पालघर 105, कल्याण 73, वसईत 71, नागपूर 13 , मीरा रोड 9, रायगड आणि नाशिक येथील प्रत्येकी आठ तक्रारी निकाली काढलेल्या आहेत. सध्या राज्यात 52 सलोखा मंचाकडे 553 प्रकरणांची सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. सलोखा मंचला 60 दिवसांत आणि अपवादात्मक स्थितीत 90 दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक असते. सलोखा मंचाची उपयुक्तता लक्षात घेता गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा अशा अनेक राज्यांतही सलोखा मंच कार्यरत आहेत. शिवाय इतरही अनेक राज्ये ही योजना समजून घेण्यासाठी महारेराच्या संपर्कात आहेत.