जर माझी गरज असेल तर मी पुन्हा येईन, डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली भावना

डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी स्टिव्हन स्मिथ सलामीला उतरतोय, पण त्याला अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे खुद्द डेव्हिड वॉर्नरनेच इच्छा व्यक्त केलीय की जर संघाला माझी गरज असेल तर मी पुन्हा येईन. नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानचा संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येणार आहे. या पार्श्वभूमीवर त्याने कसोटी पुनरागमनाच्या आपल्या भावना बोलून दाखवल्या.

डेव्हिड वॉर्नरने या वर्षाच्या प्रारंभीच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळून आपली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तेव्हापासून ऑस्ट्रेलियन संघ केवळ चारच कसोटी सामने खेळला आहे आणि या चारही कसोटी सामन्यांत सलामीला आलेल्या स्मिथने 12, नाबाद 11, 6, नाबाद 91, 31, 0, 11 आणि 9 अशा खेळ्या केल्या आहेत. वॉर्नरची सलामी पाहता स्मिथ सलामीला फारसा यशस्वी ठरलेला नाहीय. त्यामुळे वॉर्नर म्हणाला, मी नेहमीच कसोटीसाठी उपलब्ध असतो. फक्त फोन उचलणे बाकी आहे. मी याबाबत फारच गंभीर आहे.

प्रामाणिकपणे सांगायचे तर मी निवृत्त झाल्यापासून ऑस्ट्रेलिया केवळ चारच कसोटी खेळलीय. त्यामुळे माझीही तयारी त्यांच्याइतकीच आहे. कसोटी पुनरागमनासाठी मी माझ्या फिटनेसवर मेहनत घ्यायलाही तयार आहे. जर संघाला माझी खरच गरज असेल तर मला पुढचा शिल्ड स्पर्धेचा सामना खेळायला खूप आनंद होईल. मी योग्य कारणांनी कसोटीतून निवृत्ती घेतलीय, पण माझी गरज असेल तर मी पुन्हा तयार आहे. मी मागे हटणार नाही, असेही वॉर्नर म्हणाला. आगामी मालिकेतील कामगिरीवर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील भवितव्य अवलंबून असल्यामुळे ही मालिका ऑस्ट्रेलियाइतकीच हिंदुस्थानसाठीही महत्त्वाची आहे.