अव्वल मानांकित विष्णू वर्धनची विजयी सलामी

अग्रमानांकित विष्णू वर्धनने जे. एस. परेरा स्मृती एआयटीए टेनिस पुरुषांच्या स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र, चौथ्या मानांकित धीरज कोंडांचा याचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

अडीच लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या स्पर्धेत पुरुष एकेरीत वर्धनने संदेश कुवळेवर 6-2, 7-5 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. यश चौरसियाने सार्थक सुदेनला 7-5, 6-1 असे हरवत दुसरी फेरी गाठली. राशिन सॅम्युअल, प्रज्वल तिवारी, रिदम मल्होत्रा यांनीही विजयी सुरुवात केली. सॅम्युअलने जतीन नैनवर 6-1, 6-0 असे सरळ सेटमध्ये तर प्रज्वलने दीप मुनीम याला पिछाडीवरून 7-5, 1-6, 6-1 असे हरवले. रिदमने सुनीत लंका याच्यावर चुरशीच्या लढतीत पिछाडीवरून 3-6, 6-4, 6-4 अशी मात केली.