कसोटी क्रिकेट खेळाडूंना पिळून काढते, हिंदुस्थानसाठी कसोटी क्रिकेट खेळायचेय संजू सॅमसनला

गेली दोन-तीन वर्षे हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडणाऱ्या संजू सॅमसनच्या मेहनतीला आणि फलंदाजीला यश लाभलेय. गेल्याच महिन्यात त्याने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात 40 चेंडूंत घणाघाती शतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनचे खरे स्वप्न हिंदुस्थानी संघासाठी कसोटी खेळणे हेच आहे. कसोटी क्रिकेटच खेळाडूंना अक्षरशः पिळून काढते, अशीही भावना संजू सॅमसनने आपल्या मुलाखतीत व्यक्त केली.

सध्या हिंदुस्थानी संघात यष्टिरक्षकांची खाण असून सारेच एकापेक्षा एक आहेत. त्यामुळे कुणाला संधी द्यायची आणि कुणाला बाकावर बसवायचे, हा प्रश्न नेहमीच संघव्यवस्थापनाला सतावतोय. त्या यष्टिरक्षकांपैकी एक असलेल्या संजूला आता अथक प्रयत्नानंतर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये संधी मिळालीय. तो सुसाट खेळतोयसुद्धा, पण त्याचे खरे प्रेम आणि स्वप्न कसोटी क्रिकेटच आहे. मला याच क्रिकेटमध्ये खरा आनंद मिळतो. हा आनंद अन्य कोणत्याही फॉरमॅटमध्ये मिळूच शकत नाही, असे संजू सॅमसन आपल्या एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

संजूच्या म्हणण्यानुसार कसोटीतच खेळाडूची खरी गुणवत्ता आणि क्षमता दिसते. कसोटीचाच खेळ खेळाडूला अक्षरशः पिळून काढतो. मला जेव्हाही संधी मिळते मी केरळसाठी रणजी सामने खेळून माझी भूक भागवतो. जेव्हा इतक्या मेहनतीनंतर तुम्हाला यश मिळते तेव्हा त्याचा आनंद काही औरच असतो. माझी लहानपणापासून एकच इच्छा आहे की, आपणही देशासाठी कसोटी क्रिकेट खेळावे. मी कधी हे बोललो नाही. मनातच ही गोष्ट जपून ठेवलीय. माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अजूनही धडपडतोय. त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत असल्याचेही त्याने सांगितले. सॅमसनने आतापर्यंत 65 रणजी सामन्यांत 3834 धावा केल्या आहेत.