हिंदुस्थानच्या मिशन राष्ट्रकुलला मोठा धक्का; हॉकी, कुस्ती, नेमबाजी, क्रिकेट, बॅडमिंटनसह अनेक खेळांचा पत्ता कट

हिंदुस्थानला हमखास पदक मिळवून देणाऱ्या अनेक खेळांचा 2026च्या ग्लासगो (स्कॉटलंड) राष्ट्रकुल स्पर्धेतून पत्ता कट करण्यात आल्याने हिंदुस्थानच्या मिशन राष्ट्रकुल स्पर्धेला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनावर आर्थिक संकट कोसळल्यामुळे आयोजकांनी क्रीडा प्रकारच कमी करून स्पर्धा आयोजनाची औपचारिकता पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार हॉकी, कुस्ती, नेमबाजी, क्रिकेट, बॅडमिंटन, तिरंदाजी, टेबल टेनिस, स्क्वॉश, ट्रायथलॉन हे प्रमुख खेळ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत दिसणार नाहीत.

राष्ट्रकुल आयोजन समितीने वगळलेल्या नऊ खेळांपैकी हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन व नेमबाजी या चार खेळातच हिंदुस्थानने स्पर्धेच्या इतिहासात 140 सुवर्णांसह 286 पदकांची लयलूट केलेली आहे. बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नऊ प्रमुख खेळांना वगळल्याने स्पर्धेची रंगत कमी झाली आहे. खर्चाला कात्री लावण्यासाठीही काही खेळ वगळण्यात आले आहे.

2026 मध्ये 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहे. ग्लासगोने यापूर्वी 2014 मध्येही या स्पर्धेचे आयोजन केले होते. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळापत्रकात ऍथलेटिक्स, पॅराऍथलेटिक्स (ट्रक आणि फील्ड), जलतरण, पॅरा जलतरण, जिम्नॅस्टिक्स, ट्रक सायकलिंग, पॅरा ट्रक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, पॅरा पॉवरलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युदो, बोल्स या खेळांचा समावेश आहे.

याबरोबरच एक स्टेटमेंट आणि पॅरा बाऊल्स, 3 बाय 3 बास्केटबॉल आणि 3 बाय 3 व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचा समावेश केल्याची माहिती राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने सांगितली. हे खेळ स्कॉटटाऊन स्टेडियम, टोलक्रॉस इंटरनॅशनल स्विमिंग सेंटर, एमिरेट्स एरिना आणि स्कॉटिश कॉम्पिटिशन कॉम्प्लेक्स या चार ठिकाणी होणार आहेत. खेळाडू आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हिंदुस्थानची पदकसंख्या घटणार

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात हिंदुस्थानने हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन व नेमबाजी या चार खेळातच 286 पदकांची लयलूट केलेली आहे. यात बॅडमिंटनमध्ये 10 सुवर्ण, 8 रौप्य व 13 कांस्य अशी एकूण 31 पदके जिंकली आहेत. नेमबाजीत 63 सुवर्णांसह 44 रौप्य व 28 कांस्य अशा एकूण 135 पदकांना गवसणी घातलेली आहे. कुस्तीमध्येही एकूण जिंकलेल्या 114 पदकांमध्ये 49 सुकर्ण, 39 रौप्य व 26 कांस्यपदकांचा समावेश आहे. पुरुष हॉकीतही हिंदुस्थानने आतापर्यंत 3 रौप्य व 2 कांस्यपदकांची कमाई केलेली आहे. हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने 2002 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला होता. महिला हॉकी संघाच्या खात्याही तीन पदके आहेत.