IND vs NZ Test – पुण्यात जोरदार सराव

बंगळुरूतील पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. आता दोन्ही संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या कसोटीपूर्वी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर उभय संघांनी मंगळवारी जोरदार सराव केला.

पहिली कसोटी गमाविल्याने तीन सामन्यांच्या या मालिकेतील आव्हान राखण्यासाठी रोहित शर्माच्या टीम इंडियाला विजयाची गरज असेल. दुसरीकडे दुसरी कसोटी जिंकून ऐतिहासिक मालिका विजयासाठी न्यूझीलंडचा संघही मैदानावर सर्वस्व पणाला लावताना दिसेल. सकाळच्या सत्रात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी कसून सराव केला. त्यानंतर दुपारच्या सत्रात यजमान संघाने मैदानावर येऊन सरावासह व्यायामावरही भर दिला.

रोहितकडून खेळपट्टीचे सूक्ष्म निरीक्षण

बंगळुरू कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा अवघ्या 46 धावांत खुर्दा उडाला होता. पराभवानंतर ‘आम्हाला खेळपट्टीचा अंदाजच आला नाही, अशी प्रांजळ कबुली कर्णधार रोहित शर्माने दिली होती. त्यामुळे त्याने मंगळवारी पुण्यातील खेळपट्टीचे अगदी सूक्ष्म निरीक्षण केले. त्यानंतर त्याने प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशीदेखील खेळपट्टीबाबत चर्चा केली.

बुमरा, सिराजने केला फलंदाजीचा सराव

टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज या वेगवान जोडगोळीला नेटमध्ये गोलंदाजीऐवजी सर्वप्रथम फलंदाजीच्या सरावासाठी पाठविले. दोघांनीही बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. या दोघांनंतर प्रमुख रोहित, विराटसह प्रमुख फलंदाजांनी नेट सराव केला.