मुंबई विमानतळावर पक्ष्यांच्या तस्करीचे रॅकेट उद्धवस्त, 4 हॉर्नबिल पक्षी हस्तगत; दोघांना अटक

मुंबई विमानतळावर पक्ष्यांच्या तस्करीचे रॅकेट उद्धवस्त करण्यास सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट (AIU)ला यश आले आहे. हॉर्नबिल पक्षांच्या तस्करीप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघा आरोपींच्या सामानातून 4 हॉर्नबिल पक्षी हस्तगत करण्यात आले आहे.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे आरोपी सोमवारी दुपारी एअर इंडियाच्या विमानाने थायलंडहून मुंबई विमानतळावर आले. विमानतळावर त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यात लुप्तप्राय हॉर्नबिल पक्षी आढळून आले. दोन्ही आरोपींना सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली.

एका वन अधिकाऱ्याने या प्रकरणी सांगितले की, हे चारही हॉर्नबिल पक्षी विसायन आणि सुलावेसी प्रजातींचे असून ते लुप्तप्राय आहेत. हे हॉर्नबिल पक्षी चॉकलेटने भरलेल्या बॅगेत प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पॅक केले होते. हे पक्षी जिवंत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

वन्यजीव कल्याणासाठी कार्यरत असलेल्या रेसक्विन्क असोसिएशन (RAWW) या संस्थेशी संबंधित वन्यजीव तज्ञांशी सल्लामसलत करून या पक्षांना पाणी आणि अन्न देण्यात आले. हे पक्षी मूळचे भारतातील नाही. त्यामुळे वन्यजीव क्राइम कंट्रोल ब्युरो (WCCB) ने वन्यजीव (संरक्षण) कायद्यातील तरतुदींनुसार पक्ष्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याचे आदेश जारी केले, त्यानंतर पक्ष्यांना बँकॉकला परत पाठवण्यात आले, असे वन अधिकाऱ्याने सांगितले.