खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझेला जामीन; मात्र तुरुंगातून सुटका नाही

100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात यापूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींना जामीन मिळाला आहे. त्याच आधारे वाझेने जामीन देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात जामीन मिळाला तरी अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन प्रकरणात जामीन मिळाला नसल्याने वाझे तुरुंगातच राहणार आहे.

वाझेने अंतरिम जामिनासाठी अर्ज करतानाच फौजदारी दंड संहितेच्या कलम 306 (4) (बी) या कलमाच्या संवैधानिक वैधतेला आव्हान दिले. या मुद्द्यावर सुनावणी करताना केंद्र सरकारचे वकील राजा ठाकरे यांनी वाझेला जामीन देण्यावर आक्षेप नसल्याचे सांगितले.

सचिन वाझे मार्च 2021 पासून तुरुंगात आहे. त्याने सुटकेसाठी अ‍ॅड. रौनक नाईक यांच्यामार्फत रिट याचिका केली होती. त्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या द्विसदसीय खंडपीठाने मंगळवारी निर्णय दिला.

यापूर्वी त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेश देण्यास नकार देत अन्य खंडपीठाकडे जाण्यास सांगितले होते. त्यानुसार वाझेने दुसर्‍या खंडपीठासमोर दाद मागितली होती.

वाझे हा अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेली स्फोटके आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही आरोपी आहे. वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मार्च 2021 मध्ये व्यापारी मनसुख हिरेन हत्या तसेच ॲण्टिलिया स्फोटके प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून तो तळोजा तुरुंगात कैद आहे.