Maharashtra election 2024 – अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना यंदा गुरुपुष्यामृत योग

विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असली तरी बहुतांश उमेदवार हे अर्ज भरण्यासाठी मुहूर्त निवडत आहेत. कालाष्टमी आणि गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे अनेक उमेदवारांनी गुरुवारी 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पसंती दिली आहे. तर काही उमेदवारांनी 28 ऑक्टोबरला वसुबारस आणि २९ला धनत्रयोदशी असल्याने त्या दिवसाची निवड केली आहे.

प्रमुख राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज उद्या (दि. 22) पासून भरले जातील. निवडणुकीचे नोटिफिकेशन आज रात्री जारी करण्यात आले. त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील घोषित करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मुहूर्त निवडले आहेत, त्यामध्ये गुरुवारी कालाष्टमी असली तरी गुरुपुष्यामृत योग असलेल्या या दिवसाला पसंती दिली आहे. सकाळी 6.30 वाजल्यापासूनच हा मुहूर्त असल्याने मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरता येतील.

उमेदवारी घोषणेची अधिकृत प्रतीक्षा
भाजपच्या 99 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली आहे. मात्र, अन्य कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आघाडी, महायुतीमधील जागावाटप त्याचबरोबर संभाव्य उमेदवार उद्या निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेऊन जातील. त्यांना अधिकृत उमेदवारी घोषित होण्याची प्रतीक्षा आहे.

‘ना हरकत ‘साठी धावाधाव

सरकारमध्ये पदावर राहिलेल्या त्याचबरोबर आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या संभाव्य उमेदवारांना सरकारी कार्यालयात आपली कुठलीही थकबाकी नाही असे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. एक माजी मंत्री राहिलेल्या आणि नागपूरमधील सरकारी बंगला ताब्यात ठेवलेल्या इच्छुक उमेदवाराला तब्बल सव्वातीन लाख रुपये भाड्यापोटी भरावे लागले. अनेक आमदारांनी आमदार निवास सरकारी गेस्ट हाऊसचा वापर केला; परंतु त्याचे बिल न दिल्याने अनेकांना तीन ते वीस हजार रुपये थकीत रक्कम सरकारकडे जमा करावी लागली आहे. रक्कम भरल्याची पावती सादर केल्यानंतरच प्रमाणपत्र दिले जात आहे.