महायुतीतील धूसफूस कायम; भाजपच्या उमेदवारी यादीनंतर नाराजीनाट्य सुरू

विधानसभा निवणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहेत. त्यात महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण होत आले आहे. तर महायुतीत अद्यापही धूसफूस सुरूच आहे. तसेच भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर जाल्यानंतर नाराजीनाट्य सुरू झाले असून अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यताही राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी आल्यानंतर काही मतदारसंघांमध्ये महायुतीत नाराजीनाट्य सुरू झाले आहे. तसेच पहिल्या यादीत नाव नसल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपच्या इचिछक आमदारांचे टेन्शन वाढले आहे. त्यांनी आता पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. तसेच अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठून नाराजीला मोकळी वाट करून दिली.

भाजपमधील अनेक नाराज नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यात काही विद्यमान आमदारांचाही समावेश होता. त्यांची समजूत काढताना फडणवींचा दमछाक होत आहे. आमदार भारती लव्हेकर, बोरीवलीचे आमदार सुनील राणे, भीमराव तापकीर या पहिल्या यादीत नसलेल्या आमदारांनी त्यांना पुन्हा संधी द्या, असे साकडे फडणवीस यांना घातले. पक्षनेतृत्वाशी चर्चा करू असे आश्वासन फडणवीस यांनी देच पक्षासाठी त्यागाची तयारी ठेवा, असे सांगत सूचक संकेतही दिल्याची माहिती मिळाली आहे.

रत्नागिरीत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी आमदार भाजपचे बाळ माने यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. पुढील निर्णयासाठी ते कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधणार आहेत. कल्याण पूर्वमध्ये भाजपची उमेदवारी गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांना जाहीर होताच शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत, आम्ही त्यांचे काम करणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीतील खदखद उघड झाली आहे.

महायुतीत आलबेल नसताना महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीत संवाद सुरू आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने चर्चा करत आहोत. आम्हाला मविआचे सरकार आणायचे आहे. आमच्यात एकवाक्यात आहे, नाराजी नाही, असे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.